Thu, Jul 18, 2019 00:05होमपेज › Belgaon › हेल्मेट सक्ती मोहिमेने काय साधले?

हेल्मेट सक्ती मोहिमेने काय साधले?

Published On: Jun 30 2018 1:15AM | Last Updated: Jun 30 2018 12:24AMबेळगाव : प्रतिनिधी 

शहर परिसरातील अपघाती बळींच्या संख्येत घट होण्यासाठी, सुरक्षित प्रवासासाठी धारवाडपाठोपाठ बेळगावतही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हेल्मेट सक्ती मोहिमेची 27 जानेवारीपासून अंमलबजावणी सुरू आहे. याला मंगळवार 26 रोजी 5 महिने उलटले. मोहिमेपूर्वी आणि त्यानंतरच्या सहा महिन्यांतील अपघाती बळींच्या प्रमाणात किंचित घट झाली. पण मोहिमेने काय साधले, असा सवाल उपस्थित होतो. 

राजधानी बंगळूरनंतर धारवाड, बेळगाव येथे हेल्मेट सक्ती करण्यात आली. या सर्व ठिकाणी मोठे यश आले, असे म्हणता येणार नाही. शहर परिसरातील दुचाकीस्वारांकडून अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. स्वतःच्या जीवाची सुरक्षा घेण्यासाठी पोलिस कारवाईची गरज आहे का, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. वाहतूक पोलिसांनी वेगळी जरब निर्माण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. 

विना ‘आयएसआय’ हेल्मेटची विक्री सुरूच 

सहा महिन्यापूर्वी राज्य वाहतूक खात्याचे आयुक्त बी. दयानंद यांनी रस्त्याच्या बाजूला बसून विना आयएसआय दर्जाच्या हेल्मेटची विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र याबाबत अद्याप एकाही विक्रेत्यावर वा असे हेल्मेट निर्मिती करणार्‍या कंपन्यांवर कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. शहराला लागून असणार्‍या खानापूर, वेंगुर्ला, संकेश्वर या रस्त्यासह अन्य मार्गावर अशा  हेल्मेटची खुले आम विक्री होत आहे. 

नव्याचे नऊ दिवस नको 

शहरासह जिल्ह्यात पोलिसांनी 20 वर्षांत 15 हून अधिक वेळा हेल्मेट सक्तीचा प्रयोग केला. मात्र मोहीम म्हणजे नव्याचे नऊ दिवस असाच प्रत्यय यंदाही येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यंदा पहिल्या चारच दिवसात 3,500 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर मात्र यात चालढकल करण्यात येत आहे. 

सीसीटीव्ही फुटेजचे काय? 

‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी  पोलिस बंदोबस्त दिला होता. मात्र, तीन-चार दिवसातच तो काढून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई करण्याचे संकेत पोलिस आयुक्त डॉ. डी. सी. राजाप्पा यांनी दिले होते. मात्र यानंतर या कारवाईचे पुढे काय झाले, असे विचारले जात. 

पेट्रोलपंप प्रशासनाचे असहकार्य 

पोलिसांनी ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहिमेची भिस्त पेट्रोल पंप प्रशासनावर सोपविली. मात्र दारात आलेला ग्राहक का माघारी पाठवावा, या भावनेतून पेट्रोल पंप प्रशासनाने मोहिमेबाबत हात वर केले. 
सुरुवातीचे काही दिवस यासाठी प्रत्येक पंपावर एक पोलिस बंदोबस्तासाठी ठेवला होता. नंतर तो काढून घेण्यात आला.

‘माय हेल्मेट, माय लाईफ’ कुठे आहे? 

गांधीगिरी, दंडात्मक कारवाई, त्यानंतर नो पेट्रोल, नो हेल्मेट मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांनी ‘माय हेल्मेट, माय लाईफ’, या लघुचित्रपटाद्वारे सार्वजनिक ठिकाणासह शाळा, महाविद्यालयात प्रबोधन सुरू केले. मात्र काही दिवसांनी तेही आता बंद झाले आहे.