Fri, Apr 26, 2019 19:20होमपेज › Belgaon › ‘उत्तर कर्नाटक’मागणीत कितपत तथ्य?

‘उत्तर कर्नाटक’मागणीत कितपत तथ्य?

Published On: Jul 09 2018 1:01AM | Last Updated: Jul 08 2018 11:56PMबेळगाव : प्रतिनिधी

नुकताच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पानंतर स्वतंत्र उत्तर कर्नाटकची मागणी पुन्हा एकदा डोके वर काढू लागली आहे. सदर मागणीत कितपत तथ्य आहे, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. उत्तर कर्नाटकची मागणी राजकीय प्रेरित असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.राज्याची निर्मिती झाल्यापासून स्वतंत्र उत्तर कर्नाटकची मागणी वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. मात्र, त्याची व्याप्ती वाढू शकली नाही. दक्षिण कर्नाटकातील नेत्यांकडून उत्तर कर्नाटकावर अन्याय होत असल्याचा सातत्याने आरोप केला जातो. परंतु, ठरावीक वेळीच उत्तर कर्नाटकाची मागणी पुढे दामटण्यात येते. त्यामध्ये सातत्य नसते. यामुळे सामान्य नागरिकांना याचे गांभीर्य राहिलेले नाही.

यापूर्वी सदर मागणी सत्तारूढ पक्षातील काही नेत्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने करण्यात आली होती. एम. बी. पाटील, बसवराज होरट्टी, एस. आर. पाटील या साररख्या उत्तर कर्नाटकातील बड्या नेत्यांना डावलण्यात आले होते. त्यावेळी सतारूढ काँगेस आणि निजदच्या कार्यकर्त्यांनी अन्याय झाल्याची आरोळी ठोकली होती. त्यानंतर सदर मागणीने अर्थसंकल्पानंतर जोर धरला आहे.स्वतंत्र ‘उतर कर्नाटक’ राज्याच्या संकल्पनेमध्ये बारा जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये बेळगाव, विजापूर, गुलबर्गा, गदग, कोप्पळ, धारवाड, बिदर, रायचूर, हावेरी, बागलकोट, बळ्ळारी, यादगीर हे जिल्हे समाविष्ठ आहेत. सदर जिल्हे भाषिक तत्त्वावर पुनर्रचना होण्यापूर्वी मुंबई आणि हैदराबाद प्रांतात होते. तर कर्नाटकातील अन्य जिल्हे म्हैसूर प्रांतात समाविष्ठ होते. त्यामुळे दक्षिण कर्नाटकातील नेते उत्तर कर्नाटकाला सापत्नभावाची वागणूक देत असल्याची नेहमी तक्रार करण्यात येते. हे वारंवार दिसून येते.

स्वतंत्र उत्तर कर्नाटक मागणीला विरोध दर्शविण्याचे काम काही कर्नाटक एकीकरण समितीच्या नेत्यांनी सातत्याने केले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नाचा सोक्षमोक्ष लागल्याशिवाय ही मागणी पुढे रेटू नये, अशी मागणी त्यांच्याकडून होते. त्यामुळे स्वतंत्र कर्नाटकाची मागणी मागे पडते. बेळगाव जिल्ह्यात उत्तर कर्नाटकाची मागणी करण्यात आ. उमेश कत्ती  नेहमी अग्रेसर असतात. यामध्ये त्यांची राजकीय महत्त्वकांक्षा दडलेली आहे. हे उघड आहे. हे त्यांनी वारंवार दाखवून दिले आहे. त्यांच्या सूरात आता अन्य नेत्यांचेही सूर मिसळू लागले आहेत.

मागणी राजकीय फायद्यासाठी?

सदर मागणी वारंवार उपस्थित होत असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दोन वर्षापूर्वी उस आंदोलकाकडून उत्तर कर्नाटकाचा ध्वज फडकावण्यात आला. त्यानंतर काही संघटनांनी मागणी लावून धरली. परंतु, त्याला अद्याप जोर आला नाही. यामुळे सदर मागणी केवळ राजकीय हेतून प्रेरित असल्याचा आरोप नागरिकांतून करण्यात येतो.