Sat, Jul 20, 2019 13:04होमपेज › Belgaon › ‘आम्ही बेळगावकर’ संग्राह्य पुस्तिका

‘आम्ही बेळगावकर’ संग्राह्य पुस्तिका

Published On: Aug 28 2018 1:23AM | Last Updated: Aug 27 2018 11:35PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव झपाट्याने बदलत आहे. नवे ज्ञान, तंत्रज्ञान आत्मसात करून विकासाचा वेग वाढत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात अनेकांचे योगदान मिळत असून अशा ध्येयवेड्यांची नोंद ‘पुढारी’ने ‘आम्ही बेळगावकर’ या पुस्तिकेच्या माध्यमातून घेतली आहे. ही पुस्तिका संग्राह्य आणि वाचनीय झाली असल्याचे कौतुकोद्गार प्रसिद्ध साहित्यिक आणि पुरोगामी नेते कॉ. कृष्णा मेणसे यांनी काढले.

बेळगाव जिल्ह्याच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणार्‍या समाजातील अनेक मान्यवरांचा आढावा घेणारी पुस्तिका ‘पुढारी’ने सोमवारी प्रसिद्ध केली. या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा सोमवारी कॉ. मेणसे यांच्या हस्ते त्यांच्या सरस्वतीनगर येथील निवासस्थानी पार पडला. प्राचार्य आनंद मेणसे उपस्थित होते. कॉ. मेणसे म्हणाले, ‘पुढारी’ने ध्येयवेड्यांची दखल घेण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. आकर्षक व सुबक छपाई झाली असून वाचकांचे लक्ष वेधून घेते. अंकामध्ये समाविष्ट असणार्‍या मान्यवरांसोबत अन्य धर्मीय आणि भाषकांचादेखील सहभाग होणे आवश्यक होते. यामुळे पुस्तिकेला परिपूर्णता लाभली असती.

बेळगाव जिल्ह्याला आणि शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. स्वातंत्र्यलढ्यामध्ये बेळगावकरांचा सक्रिय सहभाग होता. अनेक क्रांतिकारकांनी बेळगावात आश्रय घेतला होता. यामध्ये क्रांतिअग्रणी नागनाथअण्णा नायकवाडी, जी. डी. लाड, क्रांतिकारक नाना पाटील यांचा समावेश होता. नाना पाटील यांचा आपल्याला सहवास लाभला. त्यांच्या राहण्याची सोय चव्हाट गल्लीत केली होती, असे मेणसे
म्हणाले. यानंतर झालेल्या संयुक्त महाराष्ट्र आणि गोवामुक्ती आंदोलनामध्ये बेळगावकरांनी दिलेले योगदान महत्त्वाचे होते. गोवामुक्ती आंदोलनाचे बेळगाव केंद्र बनले होते, असे सांगून त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. 

प्राचार्य आनंद मेणसे यांनीही मनोगत व्यक्त केले. निवासी संपादक गोपाळ गावडा यांनी पुस्तिकेबाबत भूमिका मांडली. व्यवस्थापक बाळासाहेब नागरगोजे यांनी आभार मानले. वितरण व्यवस्थापक अमर पाटील, विनायक पाटील, मंगेश पाटील उपस्थित होते.