होमपेज › Belgaon › वझर धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित

वझर धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित

Published On: Jul 12 2018 1:40AM | Last Updated: Jul 11 2018 10:02PMबेळगाव : संदीप तारीहाळकर

बेळगावपासून 15 कि. मी. अंतरावर असणारा चंदगड तालुक्यातील वझर धबधबा पुनर्वसू नक्षत्रातील मुसळधार पावसाने पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. याठिकाणी बेळगाव परिसरातील पर्यटक दर रविवारी तोबा गर्दी करीत आहेत. मात्र, महिपाळगडावरून या धबधब्याकडे जाताना धोकादायक वळणार सावधानता बाळगणे गरजेचे आहे. 

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील शिनोळी येथून देवरवाडी मार्ग आहे. प्रथम देवरवाडी याला लागून प्रसिद्ध हेमाड पंथीय वैद्यनाथ देवस्थान, महिपाळगड आहे. त्यामुळे हा परिसर निसर्गरम्य आणि पर्यटकांना खुणावणारा आहे. या गडाच्या उत्तरेकडे सुंडी मार्गावर वझर धबधबा असून सध्या मुसळधार पावसाने पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. यामुळे बेळगाव, खानापूर, चंदगड तालुक्यासह अन्य ठिकाणाहून रविवारसह अन्य दिवशी मोठी गर्दी होत आहे. 

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळातर्फे पाहणी करण्यात आली असून येथील विकासाला गती मिळणार आहे. या विकास कृती आराखड्यात वझर धबधब्याचा समावेश करण्याची मागणी पर्यटकांतून होत आहे. या परिसरात काही चित्रपटांची काही कालावधीसाठी चित्रीकरणही करण्यात आले आहे. या परिसराच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन व गडकोट विकासाचे बॅरंडअ‍ॅम्बॅसडर आणि रायगड विकास प्राधिकारचे अध्यक्ष  खा. छत्रपती संभाजीराजे प्रयत्नशील आहेत. कलानंदीगडच्या धर्तीवर येथे विविध कामे प्रस्तावित आहेत. महिपाळगड ते सुंडी मार्गाला लागूनच वझर धबधबा आहे. मात्र या धबधब्याखाली जाण्यासाठी सुस्थितीत वाट नाही. झाडीझुडपातून खाली उतरावे लागत आहे. याठिकाणी पायर्‍यांंच्या सुविधा झाल्यास पर्यटकांना येथील  आनंद लुटणे आणखी सोपे होईल.

यु टर्नबाबत हवी सावधानता

महिपाळगडावरून खाली उताराकडे जाणार्‍या मार्गावर मोठे यु टर्न आहे. याठिकाणी अनेकवेळा अपघात झाले आहे. काही बेधुंद पर्यटकांच्या दुचाकीसह चारचाकी वाहनांना अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांनी सावधनता बाळगणे हिताचे ठरणार आहे.