Wed, May 22, 2019 06:18होमपेज › Belgaon › पाणीटंचाईमुळे टँकरवाल्यांना सुगीचे दिवस

पाणीटंचाईमुळे टँकरवाल्यांना सुगीचे दिवस

Published On: Apr 20 2018 1:17AM | Last Updated: Apr 19 2018 8:59PMबेळगाव : प्रतिनिधी

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. शहराला कर्नाटक शहर पाणी पुरवठा मंडळाने दर पाच दिवसातून एकदा पाणी पुरवठा करण्याचे धोरण अवलंबिले असल्यामुळे अनेक नागरिकांना पाणी टंचाईशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहरामध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात असून खासगी टँकरवाल्यांची चलती सुरू आहे. सध्या पाणी टंचाईमुळे खासगी टँकर मालकांना सुगीचे दिवस आलेले आहेत. सदर पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये हे पाहण्याची जबाबदारीही मनपाची व खासगी टँकर मालकांची आहे.

मनपातर्फे सध्या पाणी टंचाई भासत असलेल्या शहरातील काही भागांना व उपनगरांना मागणीप्रमाणे टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मनपातर्फे डॉ. आंबेडकर उद्यानामधून टँकरने पाणी पुरवठा केले जातो. ते पाणी शुध्दीकरण केलेले असल्याने नागरिकाच्या आरोग्याला धोका नाही. परंतु शहरामध्ये अनेक खासगी टँकरवाले मागणीप्रमाणे नागरिकांना पाणी पुरवठा करतात. ते पाणी शुध्द केलेले नसते. नागरिकांनी नकळत त्या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला तर मात्र नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. 

खासगी टँकर मालक पाणी कोठे उपलब्ध असेल तेथील विहिरीचे पाणी टँकरमध्ये घेवून ते पुरवठा करतात. परंतु ते पाणी पुरवठा करताना ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे का,  त्या पाण्यामध्ये टीसीएल पावडर टाकून ते शुध्द केलेले आहे का,  शुध्द करण्यापूर्वीच ते पाणी पुरवठा केले जाते. यावर मनपाच्या आयुक्‍त व आरोग्य अधिकार्‍यांनी नियंत्रण ठेवण्याची नितांत गरज आहे.

खासगी टँकर मालकांना मनपाने नोटिसा काढून टँकरने पाणी पुरवठा केले जाणारे पाणी टीसीएल पावडर टाकून ते शुध्द करूनच पुरवठा करावे असे बंधन घालणे आवश्यक आहे. खासगी नागरिकांप्रमाणेच बेळगाव शहरातील अनेक हॉटेल मालकही टँकरचे पाणी घेतात. ते पाणी शुध्द व पिण्याला लायक नसेल तर हॉटेलच्या ग्राहकांना ते पाणी पिल्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो.

हे टाळण्यासाठी बेळगाव मनपाने तातडीने खासगी टँकरने पाणी पुरवठा करणार्‍या मालकांना नोटीसा बजावून पुरवठा केले जाणारे पाणी शुध्दीकरण करूनच ते पुरविले जावे, असे बंधनकारक करणे आवश्यक आहे. 

परंतु बांधकाम व औद्योगिक हेतूसाठी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यासाठी पाणी शुध्द करण्याची आवश्यकता नाही परंतु घरगुती वापरासाठी, हॉटेल, कॅण्टीन, बोर्डिंगसाठी पुरवठा केले जाणारे पाणी हे शुध्दीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी मनपा आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलण्याची नितांत आवश्यकता आहे.यासंबंधी महापौर बसाप्पा चिक्‍कलदिनी यांच्याशी संपर्क साधला असता खासगी टँकर मालकांनीही नागरिकांना शुध्द पाणी पुरवठा केला पाहिजे. यासाठी आपण मनपा आयुक्‍त व आरोग्य अधिकारी यांचे लक्ष वेधून त्यासाठी आवश्यक कृती करण्यास सांगितले जाईल, असे स्पष्ट केले.

परवानगीशिवाय पुरवठा करणार्‍यांवर बंदी घालावी

बेळगाव शहर व परिसरामध्ये टँकरने पाणी पुरवठा करणार्‍या अनेक मालकांचा समावेश आहे. एका टँकरला ते 400 ते 500 रुपये बिल आकारतात. त्या बिलावरही मनपाने नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. मनपाच्या परवानगीशिवाय खासगी टँकरने पाणी पुरवठा करण्यावर बंदी घालण्याची आवश्यकता आहे. बेळगाव मनपाने खासगी टँकर मालकावर काही नियम व अटी लागू करूनच त्यांना पाणी पुरवठा करण्याची परवानगी द्यावी.