होमपेज › Belgaon › बेळगाव शहराला पाणीपुरवठा सुरू; पण अत्यल्प...

बेळगाव शहराला पाणीपुरवठा सुरू; पण अत्यल्प...

Published On: Aug 14 2019 12:07AM | Last Updated: Aug 14 2019 12:07AM
बेळगाव : प्रतिनिधी

हिंडलगा पंपिंग स्टेशनमध्ये शिरलेले पाणी ओसरले आहे. त्यामुळे तीन पंप कार्यान्वित झाले असून, शहरात काही प्रमाणात पाणीपुरवठा सुरू झाला आहे. तर अजून दोन पंपांची दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे शनिवारपर्यंत सर्व काम संपेल आणि पूर्ण क्षमतेने पुरवठा सुरू होईल, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

अतिवृष्टीमुळे मार्कंडेय नदीला पूर आला. त्यामुळे पंपिंग स्टेशनमध्ये पाणी उपसा करणारे पाचही वीजपंप पाण्यात गेले होते. परिणामी, शहराला होणारा पुरवठा ठप्प झाला. सलग बारा दिवस पुरवठा झालेला नाही. मंगळवारी तीन वीज पंपांची दुरुस्ती पूर्ण झाली. त्यामुळे सोमवार रात्रीपासून उपसा सुरू झाला असून, मंगळवारी शहरातील काही भागात पाणीपुरवठा करण्यात आला. आता अन्य दोन पंप दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सर्व यंत्रणा पाण्यात बुडाल्यामुळे ती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी शनिवारपर्यंतचा कालावधी लागणार आहे. हिडकल येथील उपसा केंद्रांत पाणी शिरल्यामुळे पुरवठा बंद झाला आहे. आता राकसकोप येथून पूर्ण क्षमतेने पुरवठा होण्यासाठी लोकांना शनिवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. पाणीपुरवठा मंडळाचे कार्यकारी अभियंता चंद्रप्पा, सहअभियंता उमेश शिगीहळ्ळी यांनी पंपिंग स्टेशनची पाहणी करून विविध सूचना केल्या.