Mon, Aug 19, 2019 13:51होमपेज › Belgaon › महापौरांच्या वॉर्डात पाण्याची टंचाई

महापौरांच्या वॉर्डात पाण्याची टंचाई

Published On: Apr 08 2018 2:10AM | Last Updated: Apr 07 2018 11:59PMबेळगाव : प्रतिनिधी

महापौर बसाप्पा चिक्कलदिनी यांच्या वॉर्ड 55 मध्ये शास्त्रीनगर कंग्राळी बी.के. या भागात पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाल्याने नागरिकांतून मनपाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे. वॉर्डामध्ये नवीन पाईपलाईन घालण्याचे काम सुरू असल्याने नागरिकांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. पर्यायी व्यवस्था त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली  आहे. 

शहरामध्ये पाच दिवसाआड पाणी सोडले जात आहे. अनेक भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याला उच्च दाब नसल्याने सोडण्यात आलेले पाणीही अपुरे पडत आहे. कमी दाब व कमी वेळ पाणी सोडण्यात येत असल्याने टंचाई भेडसावत आहे. अशा परिस्थितीत महापौर चिक्कलदिनी यांच्या वॉर्ड 55 मध्ये येणार्‍या शास्त्रीनगर भागात 15 ते 20 दिवसांपासून पाण्याची तीव्र समस्या निर्माण ओढवली आहे. रहिवाशांना पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ आली आहे. पाण्याच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने गृहिणींतून तीव्र संताप व्यक्‍त करण्यात येत आहे. कंग्राळी बी. के. ग्रा. पं. अंतर्गत येणारा शास्त्रीनगर भाग महानगरपालिकेच्या व्याप्‍तीत घेण्यात आला आहे. यापूर्वी ग्रा.पं.मधून पाणी पुरवठ्यासाठी वाहिन्या घालण्यात आल्या होत्या. या वाहिन्यातूनच पाणी पुरवठा होत होता. मात्र, काही दिवसांपासून महानगरपालिकेकडून या भागात नव्याने जलवाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे जुन्या वाहिन्या निकामी ठरल्या आहेत. परिणामी वॉर्डामध्ये होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. ही समस्या असली तरी महापालिकेकडून भागातील नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करून देण्यात आली नसल्याचा आरोप रहिवाशांतून करण्यात येत आहे. 

शास्त्रीनगर भागातील गॅस गोडाऊन, चर्च गल्ली भागात पाण्याची तीव्र ससम्या आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे आवश्यक होते. मात्र, अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेला सर्व प्रकारचे कर भरूनही व्यवस्था मात्र अपुरी असल्याचा आरोप रहिवासी करतात.  नवीन पाईपलाईन घालण्याचे काम सुरू असून भागात टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली जात आहे.

Tags : Belgaum, Belgaum news, mayor ward, Water scarcity,