Mon, May 20, 2019 22:59होमपेज › Belgaon › आमदार निधीतून शाळांना वॉटर फिल्टर

आमदार निधीतून शाळांना वॉटर फिल्टर

Published On: Jun 25 2018 1:46AM | Last Updated: Jun 24 2018 9:11PMबेळगाव : प्रतिनिधी

राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत मध्यान्ह आहार घेतल्यानंतर विद्यार्थ्यांन शुद्ध पिण्याचा पाण्याचा अभाव दिसून येत आहे. या समस्येवर शिक्षण खात्याने उपाययोजना केली असून आमदार फंडातून प्रत्येक शाळेत फिल्टर बसविण्यात येणार आहे. 

बहुतेक शाळांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होताना दिसत नाही. काही शाळांमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याचे दिसून येते. मध्यान्ह आहार घेतल्यानंतर विद्यार्थी हातात ताट धरून इकडेतिकडे फिरताना दिसतात. काही ठिकाणी विद्यार्थी शाळेच्या शेजारी असणार्‍या घरांमध्ये पाणी पिण्यासाठी जातात. पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याने तसेच अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याने अनेक विद्यार्थी घरातून पाण्याच्या बाटल्या आणतात. 

शाळा आवारात कूपनकिला खोदून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाणी अशुद्ध असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. या समस्येचा गांभीर्याने विचार करून शिक्षण खात्याने आमदार फंडातील रकमेचा वापर फिल्टर खरेदीसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

बहुतेक शाळांमध्ये पिण्यासाठी असणारे पाणी अशुद्ध असल्याचे दिसून आले आहे. अशा शाळांतील विद्यार्थी वारंवार आजारी पडत आहेत. काहीवेळा पाणी पिल्यानंतर विद्यार्थी अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी पालक, विद्यार्थ्यांतून होत आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली असून लवकरच फिल्टर खरेदी करण्यात येणार आहेत.