Tue, Apr 23, 2019 14:11होमपेज › Belgaon › वॉटर वॉरियर्स, ग्रीन सेव्हियर्स लढताहेत उन्हाळ्याशी

वॉटर वॉरियर्स, ग्रीन सेव्हियर्स लढताहेत उन्हाळ्याशी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

दरवर्षी जागतिक तापमान अर्धा ते एक अंश सेल्सियसने वाढत असताना तसेच पाऊस वर्षागणिक कमी होत असताना बेळगाव परिसरातील काही संस्था आणि व्यक्‍ती उन्हाळा सुसह्य करण्यासाठी झगडत आहेत. रोपलागवड, वनीकरण, तलावखोदाई, जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन अशा माध्यमातून हिरवाई पुन्हा फुलवण्यासाठी आणि पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ नये, यासाठी हे लोक झगडताहेत. 
त्यात पहिले नाव येते ते शिवाजी कागणीकर या गांधीवादी कार्यकर्त्याचे. देवगिरी, कट्टणभावी परिसरातील खडकाळ भाग त्यांनी हिरवागार केला आहे. ग्रीन सेव्हिसर्य हे रोपलागवडीतील दुसरे नाव. नोकरदार मंडळी आणि व्यावसायिकांनी एकत्र येऊन दर रविवारी किमान 100 झाडे लावण्याचा उपक्रम राबविला आहे. तर प्यास फाऊंडेशनच्या माध्यमातून तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी काही व्यावसायिक युवक एकत्र येऊन लढत आहेत.

ग्रीन सेव्हियर्स

दर रविवारी पिकनिकला जाणे हा नोकरदार वर्गाचा आवडता छंद. पण दर रविवारी काही तरी विधायक करण्याचा विचार करून समीर मजली यांनी ग्रीन सेव्हियर्स संघटनेची स्थापना केली आणि नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थ्यांना एकत्र करून दर रविवारी किमान 100 झाडे लावण्याचा उपक्रम सुरू केला. 

झाडे फक्‍त लावायची नाहीत, तर जगवायचीही हे ग्रीन सेव्हियर्सचे ब्रीदवाक्य आहे. त्यामुळेच झाडे जगवण्याची जबाबदारी आधी विशिष्ट व्यक्‍तीकडे सोपवली जाते. मगच विशिष्ट ठिकाणी झाडे लावली जातात. सरकारी जागेवर झाडे लावण्याच्या परंपरेला फाटा देऊन मजली यांनी खासगी जागेत झाडे लावण्याचा उपक्रम सुरू केला तोही झाडे जगावीत म्हणूनच. ज्यांच्याकडे मोकळी जागा आहे, असे कुणीही मजली यांच्याशी संपर्क साधू शकतात. मजली व त्यांची संघटना त्या मोकळ्या जागेत रविवारचे श्रमदान करून झाडे लावते. ती झाडे जगवण्याची जबाबदारी त्या जागामालकावर असते.

सप्टेंबर 2016 पासून सुरू झालेला या उपक्रमाने नुकतीच शंभरी गाठली आहे. ग्रीन सेव्हियर्सने तब्बल 100 रविवार आणि तेही सलगपणे वृक्षलागवड केली आहे.

प्यास फाऊंडेशन

फक्‍त ‘पाणी वाचवा’ हा संदेश देणे पुरेसे नाही, तर पाणी वाचवण्यासाठी पुढाकार घेणे आणि त्यापुढे जाऊन जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करणे या उद्दिष्टाने प्यास फाऊंडेशनची स्थापना झाली. बेळगाव तालुक्यातील तारिहाळ गावचा दुष्काळ राज्यस्तरावर पोहोचल्यानंतर बेळगावातील समविचारी युवकांनी एकत्र येऊन प्यास फाऊंडेशनची स्थापना केली. डॉक्टर, उद्योजक, व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञांचा या संघटनेत सहभाग आहे. दुष्काळग्रस्तांना टँकरने पाणी पुरवण्यापासून सुरुवात केलेल्या प्यास फाऊंडेशनने आतापर्यंत तीन तलावांचे पुनरुज्जीवन केले आहे. त्यामुळे सुमारे 30 हजार लोकांच्या उन्हाळी पाण्याची सोय झाली आहे. उन्हाळ्यात पूर्णपणे दुष्काळग्रस्त होणार्‍या प्रभूनगर (ता. खानापूर), सुळगा (ता. बेळगाव) आणि अरळीकट्टी या गावांतील तीन तलावांचे  पुनरुज्जीवन ‘प्यास’ने केले आहे. त्याबरोबरच कित्तूरमध्ये 10 एकरांत पसरलेल्या तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न चालवले आहेत. परिसरातील सर्वच तलावांचे पुनरुज्जीवन करुन उन्हाळ्यात पाण्याची सोय व्हावी, यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. वृक्षारोपण हाही संस्थेच्या उपक्रमांचा एक भाग आहे.


  •