Fri, Apr 19, 2019 07:59होमपेज › Belgaon › जिल्हाधिकारी कार्यालयावर वारकर्‍यांचा मोर्चा

जिल्हाधिकारी कार्यालयावर वारकर्‍यांचा मोर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

वारकरी संप्रदायातील वारकर्‍यांचे श्रध्दास्थान असणार्‍या संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या विरोधात शिमोगा येथील ‘नाविक’ वृत्तपत्रात आक्षेपार्ह लेखन करण्यात आले आहे. यामुळे वारकरी संप्रदाय व नामदेव दैवकी समाजबांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या वृत्तपत्राच्या संपादकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करून नामदेव दैवकी संस्था, शिंपी समाज आणि वारकरी मंडळातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

विठ्ठलाचे महान भक्त असणारे संत नामदेव महाराज यांच्यावर नको ते आरोप करून त्यांच्या  नावाला कलंक लावण्याचा प्रयत्न सदर वृत्तपत्राने केला आहे. त्यामुळे समस्त शिंपी समाजासह वारकरी संप्रदायातील अनेक भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या वृत्तपत्रातील लेखनाच्या विरोधात आक्रोश व्यक्त करून शिंपी समाजासह वारकरी बांधवांनी मोठ्या संख्येने मोर्चात भाग घेतला होता. टाळ, मृदंगाच्या गजरात आगळ्या वेगळ्या पध्दतीने या लेखनाचा निषेध करण्यात आला. नाविक वृत्तपत्रात 24 ऑक्टोबरला प्रसिध्द झालेल्या वृत्तामध्ये संत नामदेव यांना दरोडेखोर म्हणून संबोधण्यात आले आहे. त्यांनी 24 खून केल्याचा उल्लेखही वृत्तपत्रात नमूद आहे. यामुळे समाजात भावनिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न वृत्तपत्राने केला आहे. संत नामदेव यांच्याविरोधात अवमानकारक लेखन केलेले एम. एन. सुंदरराज यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि वृत्तपत्राच्या प्रसिध्द झालेले अंक जप्त करावेत, अशी मागणी करण्यात आली. मोर्चामध्ये द्वारकानाथ उरणकर, दीपक खटावकर, विठ्ठल काकडे, शशिकांत हावळ, विनोद परदेशी, राजन काकडे, विठ्ठल काकडे, भोला भक्तीकर, विष्णू कोंडुसकर आदी बांधव उपस्थित होते.