Wed, Aug 21, 2019 19:39होमपेज › Belgaon › कोरमअभावी ता. पं.  बैठक तहकूब 

कोरमअभावी ता. पं.  बैठक तहकूब 

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 16 2018 8:52PMबेळगाव : प्रतिनिधी

तालुका पंचायतीच्या सर्वसाधारण बैठकीकडे बहूतांश सदस्यांनी पाठ फिरविल्याने कोरमअभावी बैठक रद्द करावी लागली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ता. पं. अध्यक्ष शंकरगौडा पाटील होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष मारुती सनदी, कार्यकारी अधिकारी एस. के. पाटील उपस्थित होते.

तालुका पंचायतीवर काँग्रेस पक्षाची सत्ता असली तरी अध्यक्ष व सदस्यांमध्ये कायम बेबनाव आहे. सत्ताधारी गाटत असलेली नाराजी तीव्रपणे दिसून आली आहे. सत्ताधारी सदस्यांनीच बैठकीकडे पाठ फिरविल्याने अध्यक्षांची नाचक्‍की झाली. 

तालुका पंचायतीला सदस्यांच्या अपेक्षेनुसार निधी मिळत नसल्याने सदस्यांतून नाराजीचा सूर कायम आहे. त्यातच सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून येणार्‍या निधीमध्ये ही पक्षपात करण्यात येत असल्याने ता. पं. सदस्यांतून अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांच्या पक्षपाती भूमिकेबद्दल नाराजी आहे. त्यामुळेच सत्ताधारी गटाकडून बोलाविण्यात आलेल्या बैठकीकडेच सदस्यांनी पाठ फिरविल्याची चर्चा सभागृहात दबक्या आवाजात सुरु आहे.

अध्यक्ष शंकरगौडा पाटील सभागृहातील सत्ताधारी गटाच्या सदस्यांना विश्‍वासात न घेता निधी वितरण व विकासकामात सहभागी करुन घेत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळेच सत्ताधारी गटात नाराजीचा सूर आहे. त्यामुळे शुक्रवारच्या सर्वसाधारण बैठकीकडे सदस्यांनी पाठ फिरविल्याची चर्चा आहे.

नियमानुसार तालुका पंचायत बैठक सकाळी 11.30  वा. प्रारंभ करण्यात आली होती. मात्र सभागृहात बैठक घेण्यासाठी आवश्यक सदस्यांचे संख्याबळ नसल्याने अर्धा तास वेळ देण्यात आला. मात्र तरीही आवश्यक संख्याबळ न झाल्याने बैठक कोरमअभावी तहकूब करण्यात आली. सभागृहात 45 सदस्यांपैकी केवळ 15 सदस्यच हजर होते. सभागृह चालविण्यासाठी 23 सदस्य आवश्यक असल्यामुळे अध्यक्षांना बैठक तहकूब करणे भाग पडले. यामुळे उपस्थित सत्ताधारी सदस्यांसह विरोधी गटातील सदस्यांनी     

तीव्र नाराजी व्यक्‍त केली. विकास कामे राबविण्यासाठी आलेल्या निधीचा कृती आरखडा तयार करुन त्यावर निर्णय घेणे आवश्यक होते. मात्र चर्चेविना बैठक बारगळल्याने  नारजी व्यक्‍त करण्यात येत होती. 

तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर, नारायण नलवडे, अप्पासाहेब कीर्तने, लक्ष्मी मेत्री, निरा काकतकर, मनीषा पालेकर, निलेश चंदगडकर, यल्‍लाप्पा कोळेकर आदी सदस्य उपस्थित होते.