Mon, Apr 22, 2019 23:44होमपेज › Belgaon › भटक्या कुत्र्यांची दहशत बेततेय जिवावर

भटक्या कुत्र्यांची दहशत बेततेय जिवावर

Published On: Jul 04 2018 2:12AM | Last Updated: Jul 03 2018 11:40PMबेळागाव : प्रतिनिधी

जिल्ह्यात सर्वत्र मालकीसह भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच पिसाळलेल्या कुत्र्यांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. नेसरगी (ता. बेळगाव) येथील पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी तरुणाच्या मृत्यू प्रकरणाने तर या प्रकाराला गंभीर स्वरुप प्राप्त झाले आहे. भटक्या कुत्र्यांबाबत आरोग्य खात्याचे धोरण अद्याप गुलदस्त्यातच आहे. दिवसेंदिवस हा प्रश्‍न गंभीर होत असताना आरोेग्य प्रशासनाचा याकडे काणाडोळा आहे. 

शासकीय धोरण हवे

घरगुती, मालकीचे श्‍वान म्हणून शहरासह ग्रामीण भागात कुत्रापालन केले जाते. मात्र, कुत्रापालनाबाबत शासकीय धोरणच नाही. अशा पाळीव कुत्र्यांची कोठेही शासकीय नोंद नसते. काही मालक सुरवातीला काही दिवस कुत्र्याचे पालनपोषण करून काही कालावधीनंतर बेवारस सोडतात. त्यानंतर या कुत्र्यांचा अस्वच्छ परिसर तसेच टाकाऊ मांसाहारी पदार्थांच्या ढिगार्‍याशेजारी वावर असतो. यानंतर मांसाला चाटावलेली कुत्री माणसांच्या जीवावर उठू लागली आहेत. 

महादेवच्या मृत्यूने जाग येणार?

3 जूनरोजी नेसरगी (ता. बेळगाव) येथील महादेव यल्लाप्पा मल्लप्पदवर (वय 38) या तरुणाचा पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी होऊन काही दिवसानंतर मृत्यू झाला. यानंतर याच गावात पंधरा दिवसांनी पुन्हा भटक्या कुत्र्यांनी घेतलेल्या चाव्यात चार लहान शाळकरी मुले जखमी झाली. भरवस्तीत, गर्दीच्या ठिकाणी असे सातत्याने हल्ले होत आहेत. याप्रकाराबाबत आरोग्यविभाग अद्याप गंभीर नाही. 

उपचाराचा खर्च न पेलणारा

कुत्र्यांच्या हल्ल्यांनी गंभीर स्वरुप घेतले आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना रेबीज या भयंकर रोगाची लागण होते. हे काहीजणांना माहितही नाही. अशातच यावर खासगी उपचार महागडा आहे. तर शासकीय दवाखान्यात या लसींचा तुटवडा भासतो. पाच हजारुपयांचा खर्च गोरगरीबांना न परवडणारा आहे. परिणामी उपचाराकडे दुर्लक्ष होते. अन् रुग्ण रेबीजमुळे मृत्यूला सामोरे जातो. 

प्रभावी जनजागृतीचा अभाव

एकीकडे सामान्य कुटुंबातही हौस म्हणून कुत्रापालन केले जाते. मात्र, पोटापाण्याच्या व्यवस्थेशिवाय संबंधित कुत्र्यांच्या आरोग्यावर 1 रुपयाही खर्च केला जात नाही. कुत्रे आजारी पडले की त्याला सोडले जाते. हीच कुत्री नंतर पिसाळली जाऊन माणसांवर हल्ले करत आहेत. याविरुद्ध जागृती हवी.

चिकन, मटण दुकानांवर हवी कारवाई

शहर परिसरासह जिल्ह्यात चिकन, मटण दुकानदार चिकन, मटण विक्रीनंतर टाकाऊ मांस आसपासच्या परिसरात उघड्यावरच टाकले जात आहेत. यामुळे भटकी कुत्री मांसाला चटावण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. असे कुत्रे पुढे बालकांना लक्ष्य करीत आहेत.