होमपेज › Belgaon › त्याने उभारली बाटलीची भिंत!

त्याने उभारली बाटलीची भिंत!

Published On: Jun 21 2018 1:26AM | Last Updated: Jun 20 2018 10:55PMदड्डी : वार्ताहर

शेट्टीहळ्ळी (ता. हुक्केरी) येथील उपक्रमशील तरुण किसन नागोजी कळवीकट्टे याने प्लास्टिक बाटलीपासून भिंत उभी केली आहे. परिसरात हा उपक्रम चर्चेचा ठरला असून टाकाऊपासून टिकाऊ हा उद्देश सफल झाल्याचे दिसून येते. 

किसन सध्या मुंबई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. सध्या ते सुटीवर शेट्टीहळ्ळी येथे आले असून दड्डी मार्गावर त्यांचे घर आहे. घरासमोर कंपाऊंड बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र कंपाऊंडसाठी येणारा हजारो रुपयांचा खर्च, खरेदी करावी लागणारी महागडी वाळू, याचा विचार करता प्लास्टिक बाटल्या उपलब्ध करून त्यात माती भरून संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय  घेतला. यानंतर त्याने आपल्या परिसरातून तीन हजार बाटल्या उपलब्ध केल्या. 

या बाटल्यांमध्ये आपल्या शेतातील माती भरून एकावर एक अशा रचल्या. किसनने या बाटल्यांचा वापर भाजलेल्या विटांसारखा केला आहे. यासाठी काळ्या मातीचा उपयोगही करण्यात आला आहे. याने कंपाऊंडला सौंदर्य प्राप्त झाले असून भक्कम भिंतही उभी राहली आहे. हा उपक्रम परिसरात चर्चेचा ठरला असून उत्सुकतेपोटी भिंत पाहण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी होत आहे.