Sun, May 26, 2019 01:21होमपेज › Belgaon › महिला पोलिस स्थानकाला इमारतीची प्रतीक्षा

महिला पोलिस स्थानकाला इमारतीची प्रतीक्षा

Published On: Jan 09 2018 1:32AM | Last Updated: Jan 08 2018 10:08PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ होत असून वाढत्या अत्याचाराच्या तुलनेत महिला पोलिस आणि ठाण्यांच्या संदर्भात शासनाचे धोरण उदासीन आहे. बेळगावातील कॅम्प येथे असलेल्या एकमेव महिला पोलिस ठाण्याचा कारभार कौलारु इमारतीत सुरु आहे. महिला अत्याचाराच्या तक्रारी वाढत असताना महिला पोलिसांची संख्या अपुरीच आहे.

वाढते अत्याचार व वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेने जिल्ह्यात महिला पोलिसांची संख्या तोकडी आहे. पोलिस खात्यातील महिला पोलिसांची संख्या वाढली पाहिजे व महिलांना अधिक प्राधान्य दिले पाहिजे, अशी सूचना गृहमंत्र्यांबरोबरच पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी करताना दिसतात. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. 

महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यास राज्यातील पोलिस बळ अपुरे आहे. त्यामुळे राज्य सरकारने महिला पोलिसांची भरती अधिक करावी. राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 50 टक्के प्रमाण महिलांचे असताना महिला पोलिसांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे म्हणणे उच्च न्यायालयानेदेखील व्यक्त केले आहे. त्यामुळे न्यायालयाने सरकारला फटकारले असून त्वरित याविषयीचा कृती आराखडा तयार करून पुढील कृती करावी, अशी सूचना केली आहे.

देशात पोलिस खात्यात महिलांना 33 टक्के स्थान देण्यात यावे, अशी चर्चा सातत्याने होत असते. मात्र प्रत्यक्षात हा प्रस्ताव कागदावरच आहे. जिल्ह्यातील महिलांची लोकसंख्या 25 लाखांच्या घरात पोहोचली असली तरी त्या तुलनेने पोलिस बळ तुटपुंजे आहे. कर्नाटकात महिला पोलिसांचे हे प्रमाण 6 टक्के आहे. जिल्ह्यात एकूण महिला पोलिस बळ 360 इतके  आहे.अलीकडेच 60 महिला पोलिसांची नव्याने भरती झाली आहे.  

बेळगाव जिल्ह्याची कमिशनररेट व जिल्हा पोलिस अशी विभागणी झाल्याने पोलिस आयुक्त व जिल्हा पोलिस प्रमुख अशी दोन प्रमुख पदे निर्माण केली आहेत. कमिशनररेटसाठी महिलांना पोलिस खात्यात अधिक स्थान देण्यात येईल, असे आश्‍वासन सरकारने दिले. मात्र ते पोकळ ठरले आहे.

होमगार्डच्या सहकार्याने महिला पोलिसांचा कारभार पोलिस ठाण्यात महिला कर्मचार्‍यांचा तुटवडा भासत असल्याची ओरड ऐकू येते.