Fri, Apr 26, 2019 09:20होमपेज › Belgaon › ससेपालनासाठी शासनाच्या मदतीची प्रतीक्षा

ससेपालनासाठी शासनाच्या मदतीची प्रतीक्षा

Published On: Jun 15 2018 1:04AM | Last Updated: Jun 14 2018 10:45PMसंबरगी : प्रतिनिधी

ग्रामीण भागात जनता दुष्काळाने होरपळत आहे. यातून काहीसा दिलासा मिळविण्यासाठी ग्रामीण भागात दूध व्यवसाय, कुक्कुटपालन व्यवसाय केला जातो. अशाच प्रकारे आजूर (ता. अथणी) येथील राजाराम व्हनखेडे यांनी ससेपालनाचा उद्योग सुरू केला असून सध्या तेे शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

या परिसरात शेती करावी तर पाणी नाही, विहिरीत थोडे पाणी आहे तर जमीन नाही, अशी परिस्थिती आहे. व्हनखेडे यांनी बिलूर (ता. जत) येथून सशाची पिले विकत आणली. सशाचे तीन महिने संगोपन करण्यासाठी त्यांना गवत, गव्हाचा भरडा, वेळोवेळी टॉनिक, आजारी पडल्यास पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना बोलावून त्यांच्यावर उपचार केले जातात. आता व्हनखेडे यांच्याकडे एकूण 100 ससे आहेत.

पशुपालन करण्यासाठी शेड बांधण्यास शासनाकडून सहाय्यधन मिळावे यासाठी वारंवार मागणी करूनसुध्दा न्याय मिळत नाही. प्रत्येक ग्रामसभेत विषय मांडला जातो, पण कार्यवाही होत नाही. नव्याने ससेपालनाचा उद्योग सुरू करणार्‍या व्हनखेडे यांना प्रोत्साहन देण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांनी शेड बांधण्यासाठी अनुदान मंजूर करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.