Fri, May 24, 2019 02:45होमपेज › Belgaon › वाघमारेला पिस्तूल पुरवणार्‍यास अटक

वाघमारेला पिस्तूल पुरवणार्‍यास अटक

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 21 2018 12:30AMबंगळूर : प्रतिनिधी

पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आणखी एका संशयितास मंगळूर जिल्ह्यातील संपाजे (ता. सुळ्या) येथून विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केली. मोहन नायक (वय 50) असे त्याचे नाव असून, या प्रकरणात अटक झालेला तो सातवा संशयित आहे. त्याला तिसर्‍या एसीएमएम न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर चौदा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.18 जुलैला त्याला अटक करण्यात आली. गौरी यांच्या हत्येसाठी त्यानेच 7.65 एम.एम.चे पिस्तूल संशयित परशुराम वाघमारे याच्या हातात दिले होते. वाघमारेला कार, मोटारसायकल, राहण्याची व्यवस्था त्यानेच केली होती, अशी माहिती मिळाली आहे. 

याआधी अटक करण्यात आलेल्या सहा संशयितांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी तिघांचा शोध घेण्यात येत होता. त्यापैकी एक संशयित सापडला आहे. या हत्येमध्ये मोहन नायकच्या भूमिकेबाबत गुप्‍तता पाळण्यात आली आहे. अन्यथा, तपासात अडथळे येणार असल्याचे एसआयटीचे म्हणणे आहे. मोहन नायक हा शस्त्रास्त्र विक्रेता आहे. शिवाय, तो गावठी औषधही देतो. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या घरी कारमधून आणि इतर वाहनांतून येणार्‍यांची गर्दी वाढत होती. औषध घेण्यासाठी त्याच्याकडे काहीजण येत असावेत, असा अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे.