Mon, Sep 24, 2018 05:13



होमपेज › Belgaon › ब्लॉग : मठाचे ‘पॉलिटिक्स’ कोणाच्या पथ्यावर?

ब्लॉग : मठाचे ‘पॉलिटिक्स’ कोणाच्या पथ्यावर?

Published On: May 06 2018 7:53AM | Last Updated: May 06 2018 7:53AM




- राजेंद्रकुमार चौगले

कर्नाटकात 4 हजारांवर छोटे-मोठे मठ आहेत; पण प्रमुख 30 मठांना लोकमान्यता आणि राजमान्यता आहे. याचा विचार करून काँग्रेसने राज्यातील लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याक समाजाचा दर्जा देण्यावर शिक्‍कामोर्तब करून या समाजाची सहानुभूती मिळवली. याउलट एरव्ही मठांच्या भरवशावर असलेल्या भाजपसाठी लिंगायत मठच डोकेदुखी होऊन बसली आहे. त्यामुळे मठांचे पॉलिटिक्स कोणाच्या पथ्यावर पडणार, याचा फैसला 15 मे रोजीच समजणार.  

लिंगायतांना स्वतंत्र धर्माची मान्यता देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. मतांचं पक्‍कं गणित बसवण्यासाठी सिद्धरामय्या सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नागमोहन दास यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती नेमली. संपूर्ण अभ्यासाअंती दास समितीने लिंगायतांना स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता दिली जाऊ शकते, असा निष्कर्ष काढला आणि सिद्धरामय्यांनी तो लगेच अंमलात आणला.
कर्नाटक सरकारने लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा दिला. शिवाय, हा प्रस्ताव राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाकडेही पाठवला. त्यामुळे कर्नाटकातील लिंगायत मठांनी आणि मठाधीशांनी आपले वजन काँग्रेसच्या पारड्यात टाकल्याची चर्चा आहे.

कर्नाटकात आजवर 22 मुख्यमंत्री होऊन गेले. त्यातले आठ मुख्यमंत्री लिंगायत समाजाचे होते. बी. एस. येडियुराप्पांवर घराणेशाही, भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही लिंगायत समाज त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचे ते महत्त्वाचे कारण होते; पण अमित शहा यांनी लिंगायत हे हिंदू धर्माचाच भाग असल्याचे वक्‍तव्य करून लिंगायतांचा रोष ओढवून घेतला आणि मठाधीशांची नाराजीही.

कर्नाटकातल्या बेळगाव, बिदर, बागलकोट, विजापूर, गदग, कोप्पल, धारवाडसह 14 जिल्ह्यांमध्ये लिंगायतांचं वर्चस्व आहे. जवळपास 96 ते 102 जागा लिंगायतांच्या पाठिंब्याशिवाय निवडून येणं अशक्य आहे. मात्र, त्याबाबतही मत-मतांतरं आहेत. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देईल का? याबाबत साशंकता आहे. मात्र, तरीही सिद्धरामय्यांनी बेरजेचे राजकारण करीत लिंगायतांना गोंजारले. उद्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने विपरीत निर्णय दिला, तरी सिद्धरामय्या ‘हिरो’ म्हणूनच वावरतील. भाजपला खलनायक म्हणून प्रोजेक्ट करतील. त्यामुळेच मोदींना दक्षिणेत मिळालेली ही तोलामोलाची लढत आहे.

मोदी, शहा आणि राहुल यांचे मठ पर्यटन

कर्नाटकात निजद किंगमेकर असेल, अशी शक्यता राजकीय विश्‍लेषकांमधून वर्तवली जात आहे; पण खर्‍याअर्थी किंगमेकरची भूमिका यावेळी 14 टक्के लिंगायत मतेच पार पाडणार आहेत. त्यामुळे मठांमधून निघणार्‍या सिक्रेट संदेशांसाठी प्रत्येक दौर्‍यात शहा, मोदी आणि राहुल यांचे मठ पर्यटन सुरू आहे.

काँग्रेससाठी लिंगायतांची मते ठरणार बोनस?

कर्नाटकात लिंगायत समाज 15 ते 18 टक्के आहे. वक्‍कलिगांची लोकसंख्याही 11 टक्के आहे. अनुसूचित जाती-जमाती तब्बल 22 टक्के आहेत. तर मुस्लिम समाजही 18 टक्क्यांच्या घरात आहे. त्यामुळे काँग्रेसला जर ही मते मिळाली, तर तो बोनस ठरू शकतो.

Tags : Karnataka, Election, 2018, Politics, BJP, PM, Narendra Modi, Congress, Rahul Gandhi,