होमपेज › Belgaon › ...अन्यथा आम्हीच अवैध कत्तलखाने बंद करू

...अन्यथा आम्हीच अवैध कत्तलखाने बंद करू

Published On: Jul 08 2018 1:43AM | Last Updated: Jul 07 2018 11:42PMबेळगाव : प्रतिनिधी

गोहत्या, शहरातील अवैध  कत्तलखाने बंद करा. अन्यथा, आम्ही ते बंद करु, असा इशारा शनिवारी विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने प्रशासनाला देण्यात आला. गोहत्या बंदीच्या मागणीसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. 

मोर्चामध्ये खा. सुरेश अंगडी, आ. अनिल बेनके, माजी आ. संजय पाटील,  चंद्रशेखर शिवाचार्य, गुरुसिध्द महास्वामी यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर स्वामी चंद्रशेखर शिवाचार्य, वजुभाई ठक्‍कर आदींनी मनोगत व्यक्‍त केले. गोहत्या बंदी सुरुच असून याकडे राज्य शासन दुर्लक्ष करत आहे. शहरात अनेक ठिकाणी अवैध कत्तलखाने सुरुच आहेत. याबाबत महापालिका चुकीचा अहवाल देत आहे. पोलिसांचेही दुर्लक्ष आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ठोस कारवाई करावी, अन्यथा या कत्तलखान्यांना टाळे ठोकू, असा इशारा यावेळी देण्यात आला.

बेळगावमधील ऑटोनगर  येथे अवैध कत्तलखाने आहेत. याबाबत महापालिका चुकीचा अहवाल देत आहे. याच ठिकाणी शीतगृहे असून,या ठिकाणी अवैधरित्या मांस साठवून ठेवले जाते. गोहत्या सुरुच असून, त्याची वाहतूकही करण्यात येते. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक होणारे मांस पकडून दिल्यास उलट त्यांच्यावरच कारवाई केली जाते. शीतगृहामध्ये बांगलादेशी नागरिक बेकायदा रहात आहेत. त्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

ऑटोनगर परिसरात अंमलपदार्थांची तस्करी सुरु असून, पोलिसांनी बेकायदेशीर राहणारे आणि अंमली पदार्थांची तस्कारी करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.
राणी चन्नम्मा  चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अतिरिक्‍त जिल्हाधिकारी बुद्याप्पा यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी कृष्णा भट, शिवानंद शिवाचार्य, शिवसिध्द सोमेश्‍वर महास्वामी, कैवल्यानंद स्वामी, निलकंठ महास्वामी, काडसिध्देश्‍वर महास्वामी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.