Wed, Mar 27, 2019 04:21होमपेज › Belgaon › ‘रोटोमॅक’चा कोठारी बेळगावात होता अटकेत

‘रोटोमॅक’चा कोठारी बेळगावात होता अटकेत

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 22 2018 11:55PMबेळगाव  :  प्रतिनिधी  

खासगी बँकांना 3695 कोटी रुपयांना गंडविल्याच्या आरोपावरून चर्चेत आलेला रोेटोमॅक कंपनीचा मालक विक्रम कोठारी याने बेळगावमध्येही एका उद्योजकाला गंडवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याबद्दल त्याला बेळगाव पोलिसांकडून अटकही झाली होती! दोन वर्षांपूर्वी ही कारवाई झाली होती. उद्योजक गुरुराज जैनापुरे यांना 3 कोटी रुपयांना गंडविण्याच्या प्रयत्नाबरोबरच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विक्रम कोठारीच्या विरोधात 2010 मध्ये उद्यमबाग पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी कोठारीला 2016 मध्ये उद्यमबाग पोलिसांनी मुंबईतून अटक करून बेळगावला आणले होते. त्यानंतर कोठारी जामिनावर सुटला, अशी माहिती उद्यमबाग पोलिसांनी ‘पुढारी’ला दिली.

नेमके प्रकरण काय?

बेळगावचे उद्योजक गुरुराज जैनापूरे व विक्रम ठोकारी यांच्यामध्ये व्यावसायिक संबंध होते. जैनापुरे यांनी कोठीरीचे संबंध असलेल्या खाण कंपनीकडून खनिज मागवले होते. त्याची रक्‍कम त्यांनी आदा केली होती. पण, पुरवठा केलेल्या खनिजापेक्षा जास्त रक्‍कम कोठारी जैनापुरे यांच्याकडे मागत होता. त्यासाठी त्याने तगादा लावला होता. पैसे देण्यास विरोध केल्याने कोठारीने मुंबई येथील सराफाला पाठवून तो सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून जैनापुरे यांच्याकडून त्यांची कार ताब्यात घेतली होती. 

कसा झाला उलगडा?

जैनापुरे यांची कार मुंबईत कारकंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी दिली गेली. दुरुस्ती झाल्यानंतर  या सर्व्हिस सेंटरमधून मालक या नात्याने   जैनापूरे यांना कार दुरुस्त करण्यात आल्याची माहिती मोबाईलवर कळवण्यात आली. त्यानंतर जैनापुरे यांना सदर प्रकरणाचा उलगडा झाला. आपल्याकडे आलेला माणूस म्हणजे सीबीआय अधिकारी नव्हता, अशी खात्री पटल्यानंतर जैनापुरे यांनी  उद्यमबाग पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. 

न्यायालयीन मदतीची गरज

2010 मध्ये तक्रार दाखल करुनही पोलिसांकडून पाठपुरावा करण्यात आला नव्हता. त्यामुळे जैनापुरे यांनी न्यायालयात याचिका दाखल करून चौकशीची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशांवरून विशेष पथकाची नेमणूक करुन शोधमोहीम हाती घेण्यात आली.  शोधपथकाने कोठारीने सीबीआय अधिकारी म्हणून आणलेल्या सराफाला मुंबईत अटक केली. तर कोठारीचे कामकाज पाहणार्‍या व्यवस्थापकाला बंगळूर येथे अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या पुराव्यावरुन कोठारीवर गुन्हा दाखल करुन कोठारीलाही उद्यमबाग पोलिसांनी अटक केली.

जामीन अटकेनंतर कोठारीने जामीन घेतला. त्यानंतर पुढच्या चौकशीसाठी पोलिसांनी शोधाशोध केली तरी तो हाती लागलेला नाही, असे पोलसांचे म्हणणे आहे. कोठारीविरोधात बेळगाव पोलसांची वॉरंटची प्रक्रिया सुरु आहे.