Fri, Aug 23, 2019 21:06होमपेज › Belgaon › ‘स्थायी’कडे इच्छुकांच्या नजरा

‘स्थायी’कडे इच्छुकांच्या नजरा

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 25 2018 8:55PMबेळगाव : प्रतिनिधी

जिल्हा पंचायत स्थायी समितीच्या मुदती संपल्याने सदस्यांच्या नजरा निवडणुकीकडे लागून राहिल्या आहेत. यासाठी इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मराठी भाषिक सदस्यांना पुन्हा एकदा संधी मिळावी, अशी अपेक्षा करण्यात येत आहे.पहिल्या टप्प्यातील स्थायी समितींची मुदत संपली आहे. नजीकच्या भविष्यता काळात स्थायीसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. . महत्त्वाच्या स्थायी समितीमध्ये वर्णी लागावी यासाठी प्रयत्न काही जणाकडून सुरू आहेत.

जि. पं. मध्ये काँग्रेसचे बहुमत आहे. मात्र काँग्रेसमध्ये अंतर्गत गट कार्यरत आहेत. काही सदस्य नाराज आहेत. स्थायीवर वर्णी लागण्यासाठी पक्षापेक्षा नेत्यावरील निष्ठा निवडीमध्ये महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आपापल्या गॉडफादरची मर्जी राखण्याचे प्रयत्न आतापासूनच सुरू झाले आहेत.स्थायीमध्ये विरोधी सदस्यांनाही समावून घेण्यात येते. प्रत्येक समितीत विरोधी सदस्यांना स्थान देण्यात येते. यामुळे भाजप, म. ए. समिती व निजदच्या सदस्यांनाही सामावून घेण्यात येईल. पहिल्या टप्प्यातील तीन स्थायी समितीची अध्यक्षपदे मराठी भाषिक सदस्यांकडे होती. अर्थ आणि लेखापरिक्षण स्थायी समितीचे  अध्यक्षपद जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे , सामान्य स्थायी समितीचे अध्यक्षपद उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांच्याकडे होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष ते पदसिद्ध अध्यक्ष म्हणून दोन स्थायी समितीमध्ये कार्यरत होते. तर शिक्षण आणि आरोग्य स्थायी समितीमध्ये बेळगुंदी मतदारसंघातील मोहन मोरे यांना अध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. यामुळे जि. पं. वर मराठीचे वर्चस्व होते.

पुढच्या टप्प्यातही दोन स्थायी समिती अध्यक्ष, उपाध्यक्षाकडे राहणार आहेत. या  समितीसाठी केवळ सदस्यांची निवड केली जाणार आहे. उर्वरित कृषी आणि उद्योग, सामाजिक न्याय आणि आरोग्य आणि शिक्षण स्थायी समिती  अध्यक्ष व सदस्य निवड होणार आहे. यामध्ये वर्णी लागावी यासाठी चढाओढ सुरू झाली आहे.काँग्रेसमध्ये सध्या अध्यक्ष निवडीमध्ये नेत्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागण्याची शक्यता आहे. जारकीहोळी बंधू आणि ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर हे आपल्या समर्थकांना मोक्याच्या जागा देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. यामुळे या निवडणुका   सदस्यापेक्षा नेत्यांच्याच प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. 

गोरल यांना संधी?

मराठी सदस्यातून सध्या रमेश गोरल यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गोरल हे ग्रामीण मतदारसंघातील असून सलग दुसर्‍यांदा जि. पं. सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर प्रशासकीय कामावर त्यांचा वचक आहे.