Tue, Aug 20, 2019 04:24होमपेज › Belgaon › चिकोडी विधानसौधमध्ये सोडल्या मेंढ्या

चिकोडी विधानसौधमध्ये सोडल्या मेंढ्या

Published On: Feb 27 2018 2:05AM | Last Updated: Feb 26 2018 11:38PMचिकोडी : प्रतिनिधी

चिकोडी जिल्ह्यासाठी मिनी विधानसौध इमारतीत सोमवारी चक्क शेळीमेंढ्या सोडून चक्काजमा  आंदोलन संगोळी रायण्णा आंदोलन समितीकडून  करण्यात आले.

22 दिवसांपासून चिकोडी जिल्ह्यासाठी उपोषणासह उपोषण आंदोलन करण्यात येत आहे. पण जिल्ह्याच्या मागणीकडे सरकार व प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.  यामुळे संगोळी रायण्णा स्मारक आंदोलन समितीच्या पदाधिकार्‍यांनी  व जिल्हा आंदोलन समितीकडून मिनी विधानसौधच्या आवारात शेळी व मेंढ्या सोडल्या. 

डंबल प्लॉटकडून निपाणी मुधोळ राज्य मार्गावरून शेकडो मेंढ्यांसह रॅली काढण्यात आली. काही काळ बसव सर्कल येथे मेंढ्यांना  रोखून रास्तारोको करण्यात आला. नंतर मिनी विधानसौध आवारात मेंढ्यांना सोडण्यात आले. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. 

ग्रेड 2 तहसीलदार प्रमिला देशपांडे यांना जिल्हा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलन समितीचे किरण गुडसे म्हणाले, चिकोडी जिल्ह्याची निर्मिती त्वरित करावी अन्यथा पुढील काळात संघटनेकडून तीव्र  आंदोलन करण्यात येईल.

ज्येष्ठ नेते बी. आर. संगाप्पगोळ, त्यागराज कदम, चंद्रकांत हुक्केरी, जयवंत भाटले, डॉ. अच्युत माने, बाबासाहेब देसाई, संजय पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हा केल्यास मुख्यमंत्र्यांना अभिषेक

चिकोडी जिल्ह्याची घोषणा केल्यास मेंढीच्या 100 लिटर  दुधाने मुख्यमंत्र्यांना अभिषेक घालू, असे संगोळी रायण्णा संघटनेचे बाळू तेरदाळेंनी सांगितले.