Thu, Jun 27, 2019 11:56होमपेज › Belgaon › दिग्गज कलाकारांचा होणार स्वरवर्षाव

दिग्गज कलाकारांचा होणार स्वरवर्षाव

Published On: Jan 19 2018 1:49AM | Last Updated: Jan 18 2018 8:49PMबेळगाव : प्रतिनिधी

शहापूर सरस्वती वाचनालय आयोजित पं. कुमार गंधर्व स्मृती संगीत संमेलनाची शनिवारपासून सुरुवात होत आहे. यातून कुमार गंधर्वांना सप्तसुरांची आदरांजली वाहण्यात येणार आहे.भाग्यनगरातील रामनाथ मंगल कार्यालयात होणार्‍या संमेलनाच्या पहिल्या दिवशी उद्घाटन सत्रानंतर दीप्ती व श्रीषा शेट्टी यांचे भारतनाट्यम् होणार आहे. 

शुभांगी जाधव (धारवाड) यांची गानमैफल होणार आहे. किराणा घराण्याच्या नवोदित गायिका शुभांगी या पं. भालचंद्र नाकोड व विभावरी बांधवकर यांच्या शिष्या आहेत.

संजय देशपांडे ख्यातनाम सतारवादक आहेत. स्मिता दामले-मोकाशी (इंदूर) यांनी अनेक ज्येष्ठ संगीतकारांकडे धडे घेतले आहे.  

निनाद अधिकारी (भोपाळ) यांचे  सितार वाद्यावर प्रभुत्व आहे. आई श्रुती अधिकारी यांच्याकडून त्यांनी प्राथमिक धडे घेतले. 

पं. सदाशिव ऐहोळे (धारवाड) किरणा घराण्याचे उदयोन्मुख गायक आहेत. हुबळीच्या नाकोड घराण्यातून त्यांनी प्राथमिक धडे घेतले, ग्वाल्हेर घराण्याचा अभ्यास केला.

रवींद्र काटोटी हे पं. रामभाऊ विजापुरे यांचे शिष्य आहेत. अ. भा. गांधर्व महाविद्यालय  मंडळाच्या अलंकार पदवीने ते विभूषित आहेत. अशोक नाडगीर (कुंदगोळ) हे गंगुबाई हनगल यांचे गंडाबंध शिष्य आहेत.  नागराज हेगडे (शिर्शी) यांनी टी. व्ही. चव्हाण, व्यंकेटश गोडखिंडी, शहीद परवेज  यांच्याकडे धडे घेतले. 

उषा टिकेकर- देशपांडे (मुंबई) या प्रसिद्ध गायक एस. जी. टिकेकर व सुमती टिकेकर यांच्या कन्या आहेत.

अभिजीत शेणॉय यांना घरातच संगीताचे धडे मिळाले. पं. डी. बी. हरिंद्र यांच्याकडे  त्यांनी ग्वाल्हेर गायकीचे शिक्षण घेतले. पं. रामचंद्र जंतहळ्ळी व आदिती उपाध्याय कैकिणी यांच्याकडूनही त्यांनी संथा घेतली. 

सप्तर्षी हाजरा  (कोलकाता) यांनी जयपूर सेनीया घराण्याचे पं. नेताजी बसू यांच्याकडे व नंतर उस्ताद मुस्ताक अलिखान, पं. बुद्धदेवदास गुप्ता यांच्याकडे धडे घेतले.

पौर्णिमा भट्ट कुलकर्णी (बंगळूर) यांनी उषा दातार, बसवराज राजगुरु, वसंत कनकापूर, कुसुम शेंडे, पं. मुरली मनोहर शुक्‍ला यांच्याकडे धडे घेतले.