Thu, Jun 27, 2019 03:37होमपेज › Belgaon › खानापूर बसस्थानकातून  बारा गावांच्या गाड्या रद्द

खानापूर बसस्थानकातून  बारा गावांच्या गाड्या रद्द

Published On: Apr 22 2018 1:11AM | Last Updated: Apr 22 2018 12:15AMजांबोटी : वार्ताहर 

आधीच अनेक बाबतीत चर्चेत असलेल्या खानापूर बसस्थानकात आणखी एका समस्येची भर पडली आहे. कमी उत्पन्न असल्याचे कारण पुढे करत या स्थानकातून तब्बल बारा गावच्या बसफेर्‍या रद्द केल्याने विशेषकरुन ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय झाली आहे. यावर तोडगा काढून त्वरित सदर बसफेर्‍या पूर्ववत सुरु करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. 

खानापूर तालुका जंगलाने व्यापलेला असल्याने काही गावांमध्ये ये-जा करण्यासाठी पक्क्या रस्त्यांची वाणवा आहे. काही गावांमध्ये रस्तेच नाहीत. असे असले तरी रस्ते असलेल्या गावांमध्ये नियमित बसफेर्‍या सोडणे गरजेचे आहे. मात्र, खानापूर बसस्थानकाचा कारभारच ढिसाळ बनल्याने बससेवेचे तीनतेरा वाजले आहेत. या स्थानकात कोणतेच नियोजन सुरळीत नसून जुन्याच बसगाड्यांवर वेळ मारुन नेली जाते. ग्रामीण भागातील नागरिक बसमधून प्रवास करतात. 

असे असताना आता त्याही बसगाड्या अचानक रद्द केल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. गेल्या दोन महिन्यात चारपाच वेळा झालेल्या वळीव पावसामुळे शेतीमशागतीच्या कामात शेतकरी गुंतला आहे. त्यामुळे बाजारचा रविवार दिवस वगळता इतर दिवशी बसमध्ये कमी गर्दी असते. मात्र, बहुतेक गावांना कोणतीच वाहतूक नसल्याने बससेवेशिवाय पर्याय उरत नाही.  जंगल भाग असल्याने प्राण्यांचा धोका  तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावे जंगलप्रदेशात येतात. त्यामुळे वन्यप्राण्यांचा धोकाही कायम असतो. त्यामुळे पायपीट जीवावर बेतणारी आहे. त्यामुळे बससेवा नियमित सुरु करण्याची मागणी होत आहे.

Tags : Belgaum, Vehicles, twelve, villages,  Khanapur, bus, stand, canceled