Thu, Jul 18, 2019 09:01होमपेज › Belgaon › अतिवेग, ओव्हरलोड बेततोय जीवावर

अतिवेग, ओव्हरलोड बेततोय जीवावर

Published On: Jun 27 2018 1:19AM | Last Updated: Jun 27 2018 12:07AMनिपाणी : मधुकर पाटील

टायर फुटून अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा अपघातांमध्ये ज्या वाहनाचा टायर फुटतो, त्या वाहनातील प्रवाशांच्या जीवाला तर धोका आहेच, पण त्याबरोबर वाहतुकीचे सारे नियम पाळून वाजवी वेगात जाणार्‍या वाहनांनाही धोका आहे. त्यामुळे टायर फुटून अपघात होण्याचा प्रकार टाळण्यासाठी लांब पल्ल्याच्या प्रवासाआधी टायरमधील हवेचा दाब तपासणे आणि वेगावर नियंत्रण ठेवणे हे दोन उपाय केले तरी अपघात कमी होतील, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

सध्या काय होतेय?

लाखो रूपयांची वाहने खरेदी करायची, पण त्यांची दुरुस्ती आणि देखभालीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार जास्त आहे. वॉरंटी काळ संपल्यानंतर वाहनांचे सर्व्हिसिंगही वेळेवर केले जात नाही. त्याचा परिणाम म्हणजे ब्रेक व्यवस्थित न लागणे, गिअर अडकणे, टायरांची अतिझीज होऊन ते गुळगुळीत होणे, इंजिन ऑईलची आयुर्मर्यादा ओलांडली जाऊन इंजिन अतिगरम होणे असे प्रकार घडतात. कोणतेही चारचाकी वाहन आज दोन लाखांपेक्षा कमी किमतीत मिळत नाही. मग सहा महिन्याला अशा वाहनावर 5 हजार रुपये खर्च करण्याची तयारी वाहनधारकांना ठेवावीच लागेल.

आयशर चालकाचा नाहक बळी

अनेक अपघात वाहने समोरसमोर धडकून किंवा थांबलेल्या वाहनावर धडकून होतात. पण, सोमवारच्या घटनेत आयशर चालक आपल्या दिशेने व्यवस्थित जात होता. त्याची काहीच चूक नव्हती. पण विरुद्ध बाजूने जाणार्‍या बोलेरोचा टायर फुटून बोलेरो दुभाजक ओलांडून आयशरला धडकली आणि चालकाचा बळी गेला.

तवंदी ते निपाणी

ऋृतू आणि हवामानानुसार  वाहनांचे टायर व अन्य पार्टस्ची काळजी घेणे आवश्यक आहे. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अनेकांचे निष्पाप बळी जातात. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाट ते निपाणीपर्यंतच्या पट्ट्यात मनमानी वाहने हाकल्याने अपघात घडत आहेत. सोमवारी बोलेरोचा टायर फुटून घडलेला अपघात हा अतिवेग आणि अतिवजनामुळेच झाला.  त्यातून पाच कुटुंबाची वाताहत झाली. घरातील कर्ता माणूस गेल्यामुळे या कुटूंबांची परिस्थितीच कठीण बनली आहे. 

बेफिकीरीही कारणीभूत

वाहन चालविताना  बेफिकीरपणाही अपघातांना कारणीभूत ठरत आहे. वाहन चालविताना अथवा पार्कींग करताना  इतरांना त्रास होईल, याचा विचार करणारे चालक सापडणे कठीण. प्रत्येक वाहनधारकाने वाहतुकीचे नियम पाळत आपल्यामुळे इतरांना त्रास न होण्यासाठी काळजी घेतल्यास  अशा घटना कमी करणे शक्य हाईल.