Tue, Jul 23, 2019 02:12होमपेज › Belgaon › वीणा लोकूर यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर !

वीणा लोकूर यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर !

Published On: Mar 24 2018 1:47AM | Last Updated: Mar 22 2018 10:24PMबेळगाव : सुनील आपटे

अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या सदस्यपदी  बेळगावातून वीणा लोकूर यांची निवड झाली. त्यांच्या समोर आता आव्हानांचा डोंगर उभा आहे. या महिनाअखेर परिषदेची नवी कार्यकारिणी घोषित होणार आहे. ज्येष्ठ नाट्यकर्मी व परिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशी यांचे पॅनेल सत्तेवर आल्यास कार्यकारिणीत समावेश होईल व एखादे पद मिळेल, अशी आशा लोकूर यांनी व्यक्त केली आहे. 

बेळगावचा नाट्यक्षेत्रात दबदबा निर्माण करण्यासाठी लोकूर यांना परिश्रम घ्यावे लागणार आहेत.  ज्या संगीत रंगभूमीने मराठी नाटक देशभर नेले आणि गाजविले, त्याची सुरुवात बेळगावातून झाली. अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्याकडे याचा अग्रमान जातो. त्यांच्या नंतर बेळगावकरांनी नटश्रेष्ठ बालगंधर्व यांच्या नाटकांचा सुवर्णकाळ पाहिला. नंतर एक-दोन नाटक कंपन्या निघाल्या. त्यांनी काही नाटके बसविली आणि महाराष्ट्रात नेली. पण गेल्या 20-25 वर्षात बेळगावातून नावलौकिक मिळविलेले नाटक झाले नाही. याबरोबरच या काळात महाराष्ट्रातून येणारी नाटकेही बंद झाली. येथील मराठी भाषा व संस्कृतीविरुद्ध वादळ आणि पूर आले आणि दमून नाहीसे झाले. इथली मराठी माणसे पुन्हा ताठ उभी राहू लागली. हौशी नाट्य कलाकारांनी अनेक नाट्य स्पर्धातून भाग घेऊन पारितोषिकांवर आपले नाव कोरले. पण या हौशी संस्थांना मर्यादा आहेत.  त्यांच्यासमोर अन्य अडचणीही आहेत. लोकूर यांना याचा अभ्यास असल्याने त्यांनी अशा संस्थांना उभारी द्यायला हवी. 

बेळगावात नाटकाच्या तालमीसाठी योग्य जागा मिळत नाही. तालीम, नेपथ्य, रंगभूषा, लाईट इफेक्टस् आदी खर्च संस्थांना स्वत:च्या पैशातून करावा लागतो. मराठी कार्यक्रमाला पथसंस्था, बँका तसेच सरकारचीही मदत मिळत नाही. लोकुर यांनी कर्नाटक व महाराष्ट्र सरकारशी पत्रव्यवहार करून हौशी संस्थांना आर्थिक पाठबळ मिळवून द्यायला हवे. बेळगावातील नाटकांना स्पर्धेसाठी परगावचे दौरे करण्याकरिता याचा खर्च परिषदेमार्फत मिळवून द्यावा लागेल. युवकांना नाट्यकलेचे आकर्षण वाटण्यासाठी नवनवीन तंत्र, सुधारणा, नवीन विषय इत्यादीसाठी नाट्य शिबिरे भरवावी लागणार आहेत.

यासाठी नाट्य परिषदेकडून मदत मिळवावी लागेल. दोन-चार प्रयोगांपलीकडे नाटके होत नाहीत. बेळगावची नाटके बाहेरगावी व तेथील नाटके बेळगावात दाखविण्याची सोय करावी लागणार आहे. नवीन नाटकांची व एकांकिकांची पुस्तके बेळगावातील वाचनालयातून किंवा दुकानातून मिळत नाहीत. ती उपलब्ध होणे आवश्यक आहे.

प्रवेश कराची डोकेदुखी

कर्नाटकाचा प्रवेश कर ही महाराष्ट्रातील नाटक मंडळींची डोकेदुखी आहे. भरमसाट कर असल्यामुळे ही मंडळी बेळगावात येऊ शकत नाहीत. यासाठी कर्नाटकाचा अवाजवी प्रवेश कर कमी करून घेणे लोकुर यांच्यासमोरील मोठे आव्हान आहे.

मनोमिलन व्हावे

परिषदेची निवडणूक पार पडली. लोकूर यांनी दोघांचा पराभव केला. आता ही कटुता संपवून, सदस्यांना विश्‍वासात घेऊन बेळगावच्या नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी मनोमिलन झाले पाहिजे.