Thu, Jun 20, 2019 00:31होमपेज › Belgaon › वेदगंगा नदीपात्र कोरडे

वेदगंगा नदीपात्र कोरडे

Published On: Apr 20 2018 1:17AM | Last Updated: Apr 19 2018 9:03PMनिपाणी : प्रतिनिधी

सीमाभागातील शेतकर्‍यांना वरदान ठरलेल्या आणि शेतकर्‍यांना बारमाही पिके घेण्यासाठी आधार ठरलेल्या वेदगंगा नदीचे पात्र सध्या कोरडे पडले आहे. वेदगंगा नदीवर सीमाभागातील बहुतांश गावातील शेतकरी अवलंबून आहेत. वेदगंगा नदीतील पाण्यामुळे उसाचे क्षेत्र वाढले आहे. पण चार दिवसांपासून  नदीचे पात्र कोरडे पडल्याने शेतकरीवर्ग हवालदिल बनला असून पाणीसमस्या गडद बनली आहे.

सध्या निपाणीसह परिसरात उष्म्याचा पारा 39 अंशावर गेला असून उष्णतेमुळे शिवारातील उभे ऊस व उन्हाळी पिकेही कोमेजून जात आहेत. वेदगंगेला बारमाही पाण्याच्या सोयीमुळे परिसरातील शेतकरी उसाचे अधिक उत्पादन घेतले आहे. कृषी खात्याच्या दप्तरी नोंदीनुसार सुमारे 7 हजार हेक्टरवर शेतकर्‍यांनी उसाचे पीक घेतले आहे.

काळम्मावाडीच्या आंतरराज्य करारामुळे कर्नाटकच्या हिस्याचे 4 टीएमसी पाणी काळम्मावाडी जलसंपदा विभागातर्फे वेळापत्रकानुसार जानेवारी ते मे महिन्याअखेर सोडण्यात येते. धरण प्रशासनाने समस्या लक्षात घेऊन पाणी सोडण्यासाठी केलेल्या नियोजित आरखाड्यात बदल करणे आवश्यक आहे. पाणी सोडण्याच्या कालावधीचा अवधी कमी करुन पात्र कोरडे पडू नये, याची दक्षता घेतली पाहिजे.

सध्याचा विचार करता वेळापत्रकानुसार अद्याप आठवड्याची मुदत आहे. पण पात्र कोरडे पडल्याने पिकांसह पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. शिवारातील रब्बी हंगामातील पिकांची काढणी पूर्ण झाली असली तरी शेतकर्‍यांनी घेतलेल्या ऊस, उन्हाळी पिकासह भाजीपाल्याचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. अनेक शेतकर्‍यांनी पाईपलाईनद्वारे पिकांना पाण्याची सोय केली आहे.

यमगर्णीनजीक असलेल्या वेदगंगा नदी पूलापासून सिदनाळपर्यंत व पश्‍चिमेस चिखली बंधार्‍यापर्यंत पात्र कोरडे पडल्याने नदीकाठावरील  शेतकर्‍यांनी नदी पात्रात ठिकठिकाणी लहान मोठे खड्डे खोदून मोटारीच्या साहाय्याने पिकांना पाणी उपसा  सुरु केला आहे. पाण्याअभावी पिके कोमेजून जात असून शेतकर्‍यांसमोर संकट उभे ठेपले आहे. त्यासाठी धरण प्रशासनाने तात्काळ कोरड्या पात्रात पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

लोकप्रतिनिधी, अधिकरी व्यस्त

सध्या कर्नाटकातील विधानसभा निवडणूक कामकाजात अधिकारीवर्ग गुंतला आहे. एरव्ही नदी पात्र कोरडे पडल्याचे समजताच लोकप्रतिनिधींकडून तालुका व जिल्हा प्रशासनाला माहिती देत पाणी समस्येची जाणीव करून दिली  जात होती. पण निवडणूक आचारसंहितेमुळे लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांना या समस्येकडे वेळ देणे मुश्किल बनले आहे.