Sun, Mar 24, 2019 16:45होमपेज › Belgaon › व्हीटीयूचे अडीच कोटी कर्मचार्‍यांनी वापरले

व्हीटीयूचे अडीच कोटी कर्मचार्‍यांनी वापरले

Published On: Jun 30 2018 1:15AM | Last Updated: Jun 29 2018 8:33PMबेळगाव : प्रतिनिधी

विश्‍वेश्‍वरय्या तांत्रिक विद्यापीठातील (व्हीटीयू) सहा कर्मचार्‍यांनी खात्यातील अडीच कोटी रुपयांचा गैरवापर केला असून संबंधितांना निलंबित करण्यात आले आहे. एवढी मोठी रक्‍कम बँकांमधून काढण्यात आली तरी बँकांनी व्हीटीयू व्यवस्थापनाला कळविले नाही. यामुळे संबंधित बँकांविरूद्ध पोलिसात तक्रार करण्यात येणार असल्याचा इशारा कुलगुरू डॉ. करिसिद्दप्पा यांनी दिला आहे.सध्या आर्थिक व्यवहारांचे लेखा परीक्षण सुरू आहे. यातून काही कर्मचार्‍यांनी  केलेल्या आर्थिक गैरव्यहाराची सविस्तर माहिती समोर येणार आहे. हा घोटाळा तत्कालिन कुलगुरू डॉ. एच. महेशप्पा यांच्या काळात झाला. ऑडिट संपल्यानंतर कुलगुरू डॉ. करिसिद्दप्पा यांना अहवाल सादर केला जाणार आहे.

दरम्यान, राज्यातील कोणत्याही विद्यापीठाला विविध बँकांमध्ये कमाल तीन खाती उघडता येतात. मात्र, व्हीटीयूची बहुतेक बँकांमध्ये खाती आहेत. गेल्या आठ वर्षातील आर्थिक व्यवहारांचे अंतर्गत ऑडिट करण्याचा निर्णय व्हीटीयू व्यवस्थापनाने घेतल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला आहे. अजूनही तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. व्हीटीयूच्या लेखा विभाग अधिकारी सपना यांनी अडीच कोटींचा गैरव्यवहार उघडकीस आल्याने आपल्याला धक्‍का बसल्याचे सांगितले. विद्यापीठाच्या नावाने प्रत्येक बँकेत खाते आहे, याची कल्पना नव्हती असे त्या म्हणाल्या.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे दहा विविध बँकांमध्ये खाती आहेत. यामध्ये सहकारी, राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांचा समावेश आहे. या सर्व खात्यात असणारी रक्‍कम नियमित चालू असणार्‍या राष्ट्रीयीकृत बँकेच्या एकाच खात्यामध्ये वर्ग करण्यात आली आहे. या बँकांतून काहीजणांचा व्यवहार सुरू होता. पण, बँकांनी याविषयी विद्यापीठाला कळविणे गरजेचे होते. त्या व्यवहारांकडे दुर्लक्ष केले. शिवाय विद्यापीठालाही अंधारात ठेवल्याने बँकांविरूद्ध कारवाईसाठी पोलिसात तक्रार करणार असल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.