Thu, Jun 27, 2019 10:23होमपेज › Belgaon › ‘वेबकास्ट’ने मतदान प्रक्रियेचे आता थेट प्रसारण  

‘वेबकास्ट’ने मतदान प्रक्रियेचे आता थेट प्रसारण  

Published On: Mar 16 2018 1:23AM | Last Updated: Mar 15 2018 8:53PMबेळगाव : प्रतिनिधी

मे मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक आयोगाने तयारी चालविली आहे. यंदाच्या निवडणुकीवर मेहरनजर ठेवलेल्या निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेसाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग तसेच सीसी कॅमेरे वापरण्याबरोबरच वेबकास्टचा वापर करण्याचे ठरविले आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी काही मतदारसंघांमध्ये वेबकास्टचा उपयोग प्रायोगिकरित्या करण्यात आला होता. इंटरनेटद्वारे थेट प्रसारण म्हणजेच वेबकास्ट असे म्हटले जाते. ही व्यवस्था आता प्रत्येक मतदारसंघात करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. वेबकास्ट वापरण्यासाठी आवश्यक असणार्‍या तंत्रज्ञान आणि साधनांबाबत आयोगाने सांगितलेल्या सर्व गरजा पूर्ण करण्यात आल्या आहेत. सर्व ग्राम पंचायतींमध्ये कॉम्प्युटर व इंटरनेटची सुविधा असल्याची माहिती ग्रामीण विकास खात्याने आयोगाला दिली आहे. इंटरनेटची समस्या असणार्‍या ग्राम पंचायतींमध्ये डेटा कार्डची सुविधा असल्याची माहिती ग्रामीण विकास खात्याला उपलब्ध झाली आहे.

आतापर्यंत निवडणूक प्रक्रियेचा व्हिडियोग्राफी व सीसी टिव्हि कॅमेर्‍यात चित्रबध्द करण्याची व्यवस्था होती. यंदाच्या निवडणुकीत वेबकास्टचा वापर होणार असल्याने  या यंत्रणेव्दारे निवडणूक प्रक्रियेचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. 

आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यातून बेळगावात दाखल झालेली मतदान यंत्रे एपीएमसी आवारातील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आली असून तेथे चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. व्हिडिओग्राफी, सीसी कॅमेरे व वेबकास्टची व्यवस्थेतून मतदान यंत्रांची तपासणी करण्यात येत आहे.

वेबकास्टिंग म्हणजे काय?     

कॉम्प्युटरवर लावलेल्या कॅमेर्‍याच्या माध्यमातून कॉम्प्युटरसमोर घडलेल्या घटनेचे चित्रण इंटरनेटच्या माध्यमातून त्याचवेळी दुसर्‍या कॉम्प्युटरवर तसेच पालक कॉम्प्युटरवर किंवा मोठ्या पडद्यावर उपलब्ध करून देणे म्हणजे वेबकास्टिंग होय. ते आयोगाला  नियंत्रण कक्षात बघून पाहता येतेच. पण महत्त्वाचे म्हणजे निवडणूक आयोगाच्या विशिष्ट संकेतस्थळावर जाऊन कुणालाही ते पाहता येईल.