Tue, May 21, 2019 04:35होमपेज › Belgaon › शहरी, ग्रामीण युवक मोबाईलच्या जाळ्यात

शहरी, ग्रामीण युवक मोबाईलच्या जाळ्यात

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 27 2018 8:15PMबेळगाव : प्रतिनिधी

सध्या माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. याचा जितका चांगला वापर होतोय तितकाच दुरुपयोग होत आहे. तरुणाई अभ्यासाकडे दुर्लक्ष करून मोबाईलच्या नादाला लागली आहे. शहरीसह ग्रामीण भागातील विद्यार्थी व युवकांमध्ये हे फॅड जास्त दिसून येत आहे. मोबाईल वेडाचे दुष्परिणाम दिसून येत आहेत.

एकविसाव्या शतकातील क्रांती व त्यातून लागणार्‍या नवनवीन शोधामुळे जग छोटे झाले आहे. यातच मोबाईल हा सामान्य वापराचे व तितकेच गरजेचे साधन बनले आहे. शहरासह ग्रामीण भागातील युवक व शालेय विद्यार्थी मोबाईलच्या जाळ्यात अडकलेले असून त्याचा प्रचंड दुरुपयोग होत आहे.  

ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबात 2 ते 3 मोबाईल असतातच. ग्रामीण भागातील 80 टक्के मुला-मुलींकडे मोबाईल दिसून येतो. सातवीपासूनच्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल आहेत. सद्य:स्थितीत लहान बाळाकडेदेखील मोबाईल असतो, ही चिंतेची बाब आहे.

शहरात शाळेत शिकत असलेल्या मुलांना काही पालक स्वतःहून मोबाईल देतात. काही विद्यार्थी व युवक आपणहून मोबाईल खरेदी करत आहेत. यामुळे शाळा, शिकवणी वर्गाकडे मुलांचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. मोबाईल खरेदीसाठी कागदपत्रांची गरज नसली तरी सीमकार्डसाठी आधारकार्ड, मतदानकार्ड, ओळखपत्र व अन्य दस्तावेज लागतात. 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींकडे सीमकार्ड देणार्‍या दुकानदारांवर कारवाई केल्यास याला आळा बसू शकेल. मोबाईलमध्ये अश्‍लील चित्रफीत करून ब्लॅकमेलिंग प्रकार वाढत आहेत. त्यामुळे मोबाईलचे वेड कमी करण्यासाठी पालकांनीच पाल्यांवर लक्ष ठेवून त्यांना यापासून परावृत्त करायला हवे. 

मुलगा दहावी किंवा बारावी  झाल्यानंतर पालकच त्यांना मोबाईल घेऊन देतात. हुशार मुलगा देखील मोबाईलच्या नादाला लागुन अभ्यासाकडे दुर्लक्ष करतो. यामुळे अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत.