Thu, Aug 22, 2019 03:51होमपेज › Belgaon › चळवळीत मागे, वळवळीत पुढे!

चळवळीत मागे, वळवळीत पुढे!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

आगामी काळात होणार्‍या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर अनेक इच्छुकांच्या आकांक्षाना धुमारे फुटले आहेत. चळवळ, संघटना, कामामध्ये गायब असणारे नेते निवडणुकीच्या  तोंडावर सक्रिय झाले आहेत. तिकिटासाठी इच्छुकांची वळवळ सुरू झाली असून सोशल मीडियाच्या आभासी जगात कार्यरत असणारे ‘नेटकरी’ नेते सक्रिय झाले आहेत. 

सध्या राजकीय वारे जोरदार वाहू लागले आहे. विधानसभा निवडणुकीचे पडघम येत्या काळात वाजणार असून त्याची प्रचिती बदलत्या राजकीय वातावरणातून जाणवू लागली आहे. सामान्य नागरिकांपासून फटकून वागणार्‍या नेत्यांना जनतेच्या समस्यांची जाणीव आता होऊ लागली आहे. त्याचे पडसाद व्हाट्सअप, फेसबुक सारख्या सोशल मीडियातून उमटताना दिसत आहेत.

जिल्ह्यातील बहुतांश नेते सोशल मीडियावर सक्रिय आहेत. आपल्या कार्यकर्त्यांचा ग्रुप त्यांच्या माध्यमातून चालविण्यात येतो. कणभर कामाची मणभर जागृती त्यातून करण्यात येते. या प्रकारांना आता ऊत आला आहे. अशा नेटकरी नेत्यांनी आतापासूनच पक्षातील, संघटनेतील वरिष्ठांच्या नावाने शंख फुंकण्यास सुरुवात केली असून आपली उमेदवारी कशी योग्य आहे, याची टिमकी वाजविण्यात येत आहे. यामध्ये सर्वच संघटनांचे उतावळे नेते कार्यरत झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत पक्षातील नेत्यांच्या नावाने खडे फोडण्यात त्यांच्याकडून धन्यता मानण्यात येते.

बेळगाव जिल्ह्यात सध्या भाजप आणि काँग्रेस पक्षात थेट लढत होणार आहे. बेळगाव दक्षिण, उत्तर, ग्रामीण व खानापूर मतदार संघात म. ए. समितीचे कडवे आवाहन राजकीय पक्षांना आहे. यामुळे त्यांच्याकडून कूटनीतीचा वापर केला जात आहे.

म. ए. समितीतील प्रभावी आणि लोकाश्रय असणार्‍या नेत्यांच्या विषयी शंका उपस्थित करण्याचे काम नेटकर्‍यांच्या माध्यमातून सुरू आहे. यामध्ये काही पगारी कार्यकर्तेदेखील सक्रिय झाले असून त्यांच्याकडून समितीबाबत चुकीची माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सोशल मीडियावर तरुण मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. जुने मतदार यापासून दूर आहेत. मात्र खोट्या माहितीचा जाणीवपूर्वक भडीमार करून संघटनेत विघ्न आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. चळवळीत मागे आणि वळवळीत पुढे असणारे नेते यामध्ये पुढाकार घेताना दिसून येत आहेत.