Fri, Apr 19, 2019 08:00होमपेज › Belgaon › अतिवृष्टी भरपाईसाठी ७ पर्यंत डेडलाईन

अतिवृष्टी भरपाईसाठी ७ पर्यंत डेडलाईन

Published On: Aug 02 2018 1:55AM | Last Updated: Aug 02 2018 1:27AMहुबळी : प्रतिनिधी

अतिवृष्टीमुळे झालेले पिकांचे नुकसान, घर कोसळलेल्यांना प्राधान्याने 7 ऑगस्टपर्यंत भरपाई मंजूर करण्याची सूचना जिल्हा पालकसचिव राकेशसिंग यांनी अधिकार्‍यांना दिली.

अतिवृष्टी आणि पूरस्थितीविषयी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.  भरपाईला कोणत्याही कारणास्तव विलंब लावू नये, अशी ताकीद त्यांनी दिली. 
जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत 26 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी 21 प्रकरणांत भरपाई देणे शक्य आहे. तीन प्रकरणे फेटाळण्यात आली आहेत. एका प्रकरणात फॉरेन्सिक लॅबोरेटरीचा अहवाल मिळालेला नाही. आणखी एक प्रकरण अलिकडेच घडले आहे. त्याबाबत पाहणी केली जात असल्याची माहिती कृषी खात्याचे सहसंचालक एच.डी. कोळेकर यांनी दिली.

खजाना-2 व्यवस्थेनुसार शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना तात्काळ भरपाई देणे शक्य होत नसल्याची तक्रार कृषी अधिकार्‍यांनी केली. त्यावर पालकसचिवांनी राज्य पातळीवर आयोजित बैठकीत हा विषय मांडून तोडगा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळ्यामध्ये दरवर्षी काही गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्या गावांना कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. तेथील जलस्रोतांचा वापर करून वाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याची सूचना राकेशसिंग यांनी दिली. नैसर्गिक आपत्ती निवारण निधी अंतर्गत अंगणवाडी खोल्यांची दुरूस्ती हाती घ्यावी. प्राथमिक शाळांमध्ये जागा असेल तर त्या ठिकाणी अंगणवाड्यांसाठी व्यवस्था करावी. पावसामुळे बेळगाव आणि चिकोडीतील बसस्थानक परिसर खड्डेमय झाला आहे. तेथे रस्ता दुरूस्तीची सूचना परिवहन मंडळाच्या अधिकार्‍यांना देण्यात आली.