होमपेज › Belgaon › ‘भारतमाला’अंतर्गत  रिंगरोड

‘भारतमाला’अंतर्गत  रिंगरोड

Published On: Aug 24 2018 12:41AM | Last Updated: Aug 23 2018 8:22PMबेळगाव : प्रतिनिधी

दक्षिण-उत्तर भारत जोडणार्‍या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘भारतमाला’ योजनेंतर्गत पणजी-हैद्राबाद हा चार पदरी राष्ट्रीय महामार्ग निर्माण करण्यात येणार आहे. या अंतर्गत बेळगावसह चित्रदुर्ग आणि बंगळूर येथे रिंगरोड बनिवला जाणार आहे. डिसेंबरमध्ये रस्ताकाम सुरू होणार असून 2022 पर्यंत ते पूर्ण केले जाणार आहे.

देशाची अर्थव्यवस्था सुदृढ करण्यात या योजनेचा महत्त्वाचा वाटा असणार आहे. रस्ता निर्माणाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणवर सोपविण्यात आली आहे. हा रस्ता हैदराबाद येथून सुरू होईल. रायचूर, लिंगसूर, बागलकोट, बेळगावमार्गे पणजीला जोडणार आहे. सध्या अस्तित्वात असणारा रायचूर-बेळगाव राज्य महामार्ग भारतमाला योजनेंतर्गत चार पदरी राष्ट्रीय महामार्ग होणार आहे.

रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूला प्रत्येकी 22.5 मीटर रुंद असा एकूण 45 मीटर रुंद रस्ता असणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात 25 हजार कि. मी. रस्ता निर्माणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. डिसेंबरमध्ये योजनेच्या कामाची सुरवात होणार आहे. 2022 मध्ये योजना पूर्ण होईल. पणजी-हैदराबाद महामार्ग होणार असल्याने या भागातील सामाजिक आर्थिक व्यवस्था, भूसंपादन यासह विविध तांत्रिक सर्वेक्षणाची जबाबदारी नोएडा हायवे रिसर्च इन्स्टिट्यूटकडे सोपविण्यात आली आहे.

उपनगर, रिंग रोड, उड्डाणपूल, 44 विशेष आर्थिक क्षेत्र, ट्रक बे, लॉजिस्टीक पार्क यासह विविध व्यवस्था योजनेंतर्गत होणार आहे. केंद्रीय रस्ता निधी, बाँड वितरण, खासगी भागीदारीने योजना जारी केली जाणार आहे. यासाठी केंद्रीय सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने याला मंजुरी दिली आहे. हा मार्ग हैदराबादमधील मेहबूबनगर, रायचूर, लिंगसूर, हुनगुंद, अमीनगड, बागलकोट शहर, लोकापूर, यरगट्टी, बेळगाव, जांबोटी, चोर्ला, पणजी येथून जाणार आहे.