Sun, Jul 21, 2019 02:03होमपेज › Belgaon › राज्यात अघोषित भारनियमन

राज्यात अघोषित भारनियमन

Published On: Mar 07 2018 12:16AM | Last Updated: Mar 06 2018 11:48PMबेळगाव : प्रतिनिधी

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच राज्यातील जनतेला विजेच्या भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. राज्यात तास ते दोन तास अघोषित भारनियमन करण्यात येत आहे. मागणीच्या तुलनेत वीज उत्पादन कमी असल्यामुळे भारनियमन करण्यात येत आहे.मात्र हे भारनियमन तांत्रिक कारणामुळे करण्यात येत असल्याचा दावा वीज मंडळाच्या अधिकार्‍यांकडून करण्यात येत आहे. धरणामध्ये पाण्याचा साठा कमी असून याचा फटका बसत आहे. त्याचबरोबर कोळशाचा कमी पुरवठा आदी कारणामुळे वीजउत्पादनात घट झाली आहे. हिवाळ्यात 7500 ते 8500 मे. वॅ. विजेची मागणी होती. फेब्रुवारी अखेरपर्यंत ही मागणी 9 हजार मे. वॅ. पर्यंत गेली. येत्या काळात 10,500 मे. वॅ. पर्यंत वीज मागणी जाण्याची शक्यता आहे. यामुळे अडचण निर्माण झाली आहे.

कोळशाची समस्या

सध्या 2 हजार मे. वॅ. विजेची कमतरता आहे. अतिरिक्त वीज उत्पादनासाठी औष्णिक ऊर्जा प्रकल्पावर अवलंबून राहावे लागत आहे. परंतु, याठिकाणी दगडी कोळशाचा तुटवडा भासत आहे. यापूर्वी किमान 15 दिवस पुरेल इतका दगडी कोळसा साठविण्यात येत असे. मात्र अलीकडे कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. बळ्ळारी, रायचूर आदी औष्णिक प्रकल्पात दरवर्षी 172 लाख टन कोळशाची आवश्यकता असते.

1000 मे. वॅ. वीजखरेदी
आगामी काळात विजेची कमतरता भासणार आहे. यासाठी 1 हजार मे. वॅ. वीज खरेदी करण्यात यावी, असा प्रस्ताव सरकारने केईआरसीला पाठविला आहे. त्यानुसार 900 मे. वॅ. वीज खरेदीला ऊर्जा खात्याने पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर पुन्हा 500 मे. वॅ. वीजखरेदीचे प्रयत्न सुरू आहेत.

भारनियमन टाळणे अवघड

राज्यातून विजपुरवठ्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे मागणीच्या तुलनेत वीजपुरवठा करणे अवघड बनत आहे. यासाठी ग्रामीण भागात तीन ते चार तास, शहरी भागात एक ते दीड तास अशा पद्धतीने भारनियमन करण्यात येत आहे. शेतीपंपासाठी 7 तास वीजपुरवठा करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र विजेअभावी चार ते पाच तास थ्रीफेज वीजपुरवठा करण्यात येत आहे.

3553 दशलक्ष युनिट

उन्हाळ्यात आवश्यक वीज उत्पादन करण्यासाठी लिंगनमक्‍की, सुपा, मानी जलाशयात किमान 4500 दशलक्ष युनिट वीज उत्पादन होण्याइतका पाणीसाठा आवश्यक असतो. परंतु, याठिकाणी असणार्‍या पाणीसाठ्यातून 3553 दशलक्ष युनिट इतकीच वीजनिर्मिती होऊ शकते.