Wed, Mar 20, 2019 12:46होमपेज › Belgaon › रुंदीकरण थांबवा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार

रुंदीकरण थांबवा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार

Published On: Jan 30 2018 1:55AM | Last Updated: Jan 29 2018 10:37PMउचगाव : वार्ताहर

तुरमुरी येथील कचरा डेपोचे विस्तारीकरण करण्यासाठी डेपोजवळ असलेल्या रिकामी जागेचे सपाटीकरण करण्यात येत आहे, ते त्वरित थांबवावे अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा  तुरमुरी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला. या मागणीचे निवेदन सोमवारी महापौर संज्योत बांदेकर व जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांना देण्यात आले. मागील दहा वर्षापासून तुरमुरी ग्रामस्थांना विश्‍वासात न घेता कचरा डेपो सुरू करण्यात आला आहे. यामुळे या भागात दुर्गंधी पसरली आहे. या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा डेपोतून येणार्‍या पाण्यामुळे या परिसरातील विहिरींचे पाणी दूषित बनत चालले असून त्यातून रोगराई पसरत चालली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नदेखील गंभीर बनला आहे. 

कचराडेपोचे स्थलांतर करण्याची मागणी करत वारंवार आंदोलन करण्यात आले. लोकप्रतिनिधी, अधिकार्‍यांना निवेदने देण्यात आली आहेत. निवडणुकीच्या तोंडावर अनेक लोकप्रतिनिधींनी कचरा डेपो हालविण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र त्याचा विसर लोकप्रतिनिधींना पडला आहे. यामुळे ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे. नागरिकाकडून कचराडेपो स्थलांतर करण्याची मागणी करण्यात येत आहे. असे असतांना डेपो स्थलांतर करण्याऐवजी डेपोसभोवती असणार्‍या जागेत सपाटीकरण करण्यात येत आहे. यातून कचराडेपो पुन्हा वाढविण्यात येणार आहे. हे रुंदीकरण त्वरित थांबविण्यात आले नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा तुरमुरी, कल्लेहोळ, उचगाव, कोनेवाडी, सुळगा, अतिवाड, बसुर्ते आदी गावातील नागरिकांनी दिला आहे. निवेदन देतांना  ग्रा. पं. अध्यक्ष नागनाथ जाधव , सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.