Thu, Apr 25, 2019 13:58होमपेज › Belgaon › मंगळवार ठरला ‘अपघात’वार

मंगळवार ठरला ‘अपघात’वार

Published On: Feb 14 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 12:33AMनिपाणी : प्रतिनिधी

निपाणी-चिकोडी मार्गावर कार व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन कारमधील दोघेजण जागीच ठार झाले. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला. संभाजी आत्माराम आवटे (वय 25, रा. पिंपळगाव खुर्द, ता.कागल) व संग्राम धनाजी नागराळे (20, रा.शाहूनगर, कागल) अशी मृताची नावे आहेत. 

संभाजी आवटे यांचा गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये खत विक्रीचा व्यवसाय आहे. त्यानिमित्त ते निपाणीला आले होते. खत वाहतुकीसाठी त्यांनी संग्रामचे वडील धनाजी नागराळे यांचा ट्रक भाड्याने घेतला होता. धनाजी यांना भेटून तो संग्रामसमेवत संभाजी निपाणीहून कागलकडे निघाला होता. त्यांची कार चिक्‍कोडी मार्गावर जनावर बाजारच्या गेटसमोर असता निपाणीहून ऊस खाली करून नाईग्लजकडे निघालेल्या ट्रॅक्टरशी त्यांची धडक झाली. 

स्थानिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत पोलिसांना माहिती दिली तसेच 108 रुग्णवाहिकेला पाचारण केले, पण दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. रात्री उशिरा दोन्ही मृतदेहांचे विच्छेदन झाल्यांनतर ते नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

संग्रामचे नुकतेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले होते. तो वडिलांच्या कामात मदत करत होता. त्याच्या पश्‍चात आई,वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. तर मृत संभाजी याच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. रात्री उशिरा ट्रॅक्टरचालक खोत याने बसवेश्‍वर चौक पोलिसांत फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक बी. वाय. बेटगेरी तपास करीत आहेत.

बेळगावचे दोन विद्यार्थी जखमी

निपाणी : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल न्यू प्रार्थनासमोर कोल्हापूरहून बेळगावकडे निघालेल्या दुचाकीची संरक्षण कठड्याला धडक बसून झालेल्या अपघातात बेळगाव येथील केएलईच्या दंत वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी असे दोघेजण जखमी झाले. अपघात मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास झाला. केदार देवणे (वय 21)व राशी सोमानी (21) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोल्हापूर येथील मित्राकडे गेले होते. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद पोलिसांत झाली नव्हती.

केदार व राशी हे आपल्या अन्य दोघां मित्र-मैत्रिणीसमवेत दुचाकीवरून कोल्हापूरला गेले होते. हे चौघेही दोन स्वतंत्र दुचाकीवरून बेळगावकडे परतत होते. हॉटेल न्यू प्रार्थनासमोरील उड्डाण पुलावर दुचाकीस्वार राशी हिचा ताबा सुटल्याने दुचाकीची संरक्षक कठड्याला धडक बसली. यात दोघेही बाजूला फेकल्याने गंभीर जखमी झाले. सोबत असणार्‍या त्यांच्या मित्रांनी लागलीच स्थानिक नागरिकांच्या मदतीने खासगी अ‍ॅम्ब्युलन्स बोलावून जखमी दोघांना बेळगाव येथील केएलई रुग्णालयात केले.