Wed, Apr 24, 2019 01:38होमपेज › Belgaon › बेळगावचे दोन युवक एसआयटीच्या ताब्यात

बेळगावचे दोन युवक एसआयटीच्या ताब्यात

Published On: Aug 09 2018 1:35AM | Last Updated: Aug 09 2018 1:35AMबेळगाव : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) बेळगाव परिसरातील दोन युवकांना ताब्यात घेतले आहे. एक युवक महाद्वार रोड परिसरातील रहिवाशी असून, दुसरा युवक कलखांबचा आहे. या दोघांनी लंकेश यांच्या मारेकर्‍यांना आश्रय दिल्याचा संशय आहे. त्याची खातरजमा झाल्यास या दोघांना अटक करण्यात येईल.

महाद्वार रोड परिसरातील तरुण हिंदुत्ववादी संघटनेशी संंबधित  आहे. त्याच्या तपासासाठी एसआयटी पथक बेळगावात ठाम मांडून असून ‘एसआयटी’चा बेळगावचा हा चौथा दौरा आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी विजापूर येथील परशुराम वाघमारे याला अटक करण्यात आल्यानंतर चौकशीसाठी त्याला बेळगावात आणण्यात आले होतेे. परशुरामला शस्त्र प्रशिक्षण जांबोटी आणि लोंढ्याच्या जंगलात देण्यात आले होते. तशी माहिती परशुरामनेच दिली होती. त्यानंतर ‘एसआयटी’ने बेळगाववर लक्ष केंद्रित केले आहे.

परशुरामने कपिलेश्‍वर परिसरात सुमारे 20 दिवस वास्तव्य केले होते. त्यावेळी त्याला जेवण पुरवण्याचे काम स्थानिक युवक करत होते. त्यामुळे ‘एसआयटी’ने  महाद्वार रोड, संभाजी गल्ली परिसरात लक्ष केंद्रित केले आहे. ‘एसआयटी’ने ताब्यात घेतलेल्या युवकाचा महामार्गावर ढाबा असून त्याठिकाणी मारेकर्‍यांनी आश्रय घेतला होता, असे तपासातून पुढे आले आहे. अटक करण्यात आलेले संशयित मारेकरी अमोल काळे व परशुराम वाघमारे  महामार्गावरील धाब्यामध्ये वारंवार राहत होते, असे चौकशीतून पुढे आले आहे. 

तथापि, परशुराम आणि अमोल काळे हे धर्मप्रचारक असल्याने सदर व्यक्तींना आश्रय दिला होता, अशी माहिती ताब्यात घेतलेल्या तरुणाने ‘एसआयटी’ला दिली आहे. प्रत्यक्ष खुनाशी आपला कोणताचा संबंध नाही, असेही त्याने पथकाला सांगितले असल्याचे समजते. 

खानापूरचा दौरा?

ताब्यात घेतलेल्या तरुणाला घेऊन ‘एसआयटी’ने खानापूर भागात भेट दिल्याचेही समजते. या भागात त्याचा यापूर्वी ढाबा होता. पथकाने याठिकाणीही तपास केला आहे. 

कलखांबमध्येही चौकशी

लंकेश हत्येशी संबंध असल्याच्या संशयावरून कलखांब येथील एका युवकाची ‘एसआयटी’ने चौकशी केली असल्याचे समोर आले आहे. ‘एसआयटी’ने सदर तरुणाला अटक ताब्यात घेतल्याची माहिती समजताच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ‘एसआयटी’ अधिकार्‍यांचा पाठलाग करून चौकशीचे ठिकाण शोधून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘एसआयटी’ला त्याची कुणकण लागताच ‘एसआयटी’ने संशयिताला एका वकिलाच्या घरी नेऊन तेथेच चौकशी केली, असे समजते.  मडिकेरी येथून अटक करण्यात आलेल्या राजेश बंगारे, हुबळी येथून अटक करण्यात आलेल्या गणेश मिश्कीन, व अमित बिद्दी यांना घेउन ‘एसआयटी’ पोलिसांनी खानापूर परिसरात तपास चालविला आहे.