Sun, Jul 21, 2019 01:29होमपेज › Belgaon › जामीनासाठी केंद्र देणार पैसे : कर्नाटकातही हजारो कच्चै कैदी

दोन वर्षे बंदिस्त कच्चे कैदी होणार मुक्‍त

Published On: May 31 2018 1:35AM | Last Updated: May 31 2018 12:25AMबंगळूर : प्रतिनिधी

किरकोळ गुन्हे केलेले पण दोन वर्षांपासून जामीनाविना तुरुंगात खितपत पडलेले कैदी लवकरच मुक्त होणार आहेत. तुरुंग ओव्हरफुल्ल झाल्यामुळे या कैद्यांच्या जामीनाचे पैसे सरकारच भरणार आहे. कर्नाटकाही हजारो कच्चे कैदी गेल्या काही वर्षांपासून कारागृहात खितपत पडलेले आहेत.

केंद्र सरकारने स्वतंत्र निधी निर्माण करण्याची योजना आखली आहे. राज्य सरकारच्या मदतीने हा निधी निर्माण केला जाईल. योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये कायदा व न्याय खात्यातर्फे देशभरातील 11,916 महिला कैद्यांना जामीनासाठी आवश्यक ती रक्‍कम देण्यात येणार आहे. न्यायालयाने जामीन मंजूर करून दिलेला असला तरी जामीनासाठी हमी देण्यात येणारी रक्‍कम त्या महिला कैद्यांकडे नसल्यामुळे त्या कारागृहातच खितपत पडल्या आहेत. राष्ट्रीय गुन्हा नोंद विभागाने दिलेल्या रेकॉर्डनुसार 2015 मध्ये देशभरातील विविध कारागृहामध्ये 3 लाख कच्चे कैदी आहेत. त्यापैकी 62669 हे उत्तर प्रदेशमधील कारागृहात आहेत. 

या योजनेनुसार निधी निर्माण करण्याकरिता केंद्र सरकारने सर्व राज्यांना या योजनेचा प्रस्ताव पाठवून दिलेला आहे. क्षुल्लक गुन्ह्यासाठी ज्या कच्च्या कैद्यांनी दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी तुरुंगात घालवलेला आहे त्या कैद्यांना जामीन रक्‍कम देण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. क्षुल्लक गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त 3 वर्षाची शिक्षा आहे. क्षुल्लक गुन्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या जामीनासाठी 500 रुपयांपासून ते 5 हजार रुपयांपर्यंत जामीनासाठी रक्‍कम भरण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय गुन्हा नोंदणी विभागाच्या माहितीनुसार विविध कारागृहामध्ये 4 हजार कच्चे कैदी 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधी कारागृहात आहेत. 

कारागृहामध्ये वाढत्या कैद्यांच्या संख्येबद्दल सर्वोच्च न्यायालयानेही आपले मत व्यक्‍त केले होते. काही कारागृहांमध्ये तर दीडशे कैद्यांना ठेवण्याची व्यवस्था असली तरी त्यापेक्षा जास्त कैद्यांचा भरणा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशातील उच्च न्यायालयांना सूचना करून कच्च्या कैद्यांना तुरुंगात डांबताना मानवी हक्‍काचे उल्लंघन झाले आहे का ? त्याची चौकशी करण्याची सूचना केली आहे. 

कारागृहामधून कैद्यांची संख्या बेसुमार वाढलेली असल्याने केंद्र सरकारने खुली कारागृहे स्थापना करण्याचा विचार केला आहे. त्या कारागृहामधून शिक्षा झालेल्या कैद्यांना कारागृह आवारामध्ये काम करण्याची मुभा देण्यात येणार आहे. त्याबद्दल त्यांना ठराविक वेतनही दिले जाणार आहे. आपले कामकाज संपल्यानंतर त्या कैद्यांनी सायंकाळी कारागृहात परतावयाचे आहे. देशभरात 63 ठिकाणी खुल्या कारागृहांचा समावेश आहे.