Tue, Jun 02, 2020 23:14होमपेज › Belgaon › लंकेश हत्येतील दुचाकी जप्‍त

लंकेश हत्येतील दुचाकी जप्‍त

Published On: Aug 29 2018 1:41AM | Last Updated: Aug 29 2018 12:47AMबंगळूर : प्रतिनिधी

पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली दुचाकी महाराष्ट्र आणि कर्नाटक विशेष तपास पथकाने जप्‍त केली असून ती नांदेड पासिंगची असल्याचे स्पष्ट झालेे आहे. दुचाकीची वारंवार विक्री करण्यात आल्याने मूळ मालकाचा शोध घेण्यात येत आहे.

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी एटीएसकडून अटक करण्यात आलेला संशयित माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर याने चौकशीवेळी  दुचाकीबाबतची माहिती उघड केली होती. त्या दिशेने एसआयटीने तपास करून  दुचाकी जप्‍त केली. 

गौरी हत्या प्रकरणात कर्नाटक एसआयटीच्या अटकेत असणारा मास्टरमाईंड अमोल काळे आणि इतर संशयितांचा सहभाग विचारवंतांच्या हत्येत आहे. काळे हा पानसरे, लंकेश आणि कलबुर्गी हत्येतील मास्टरमाईंड असल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत उघड झाले आहे. अमित दिगवेकरने या सर्व हत्यांसाठी आर्थिक बाजू सांभाळली. काळेने पिस्तूल पुरविले. राजेश डी. बंगेराने संशयितांना पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याचे आतापर्यंतच्या तपासातून उघड झाले आहे. कर्नाटक एसआयटी आणि महाराष्ट्र एटीएसने पांगारकरच्या माहितीवरून जालना येथे तपास केला. त्यावेळी त्याने तेथील फार्म हाऊसवर बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात होते, असे सांगितले. याबाबत आता अधिक तपास केला जात आहे.

पिस्तूलसाठी प्रयत्न 

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर विशेष तपास पथकाने (एसआयटी) याबद्दलची संपूर्ण माहिती वर्षभरातच मिळविली आहे. काही पुरावेही गोळा केले असून आता पिस्तूलसाठी महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) पाठपुरावा केला जात आहे. पिस्तूलची पाहणी करण्यासाठी रितसर परवानगी मागण्यात आली आहे.

गौरी लंकेश आणि विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या 7.65 एम. एम.च्या एकाच पिस्तूलने झाल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवाय या दोघांची हत्या ऑगस्टमध्येच करण्याचा कट आखण्यात आला होता. महाराष्ट्र एटीएसने काही दिवसांपूर्वी मुंबई व इतर ठिकाणी कारवाई करून डॉ. दाभोलकर यांच्या हत्येतील संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून काही पिस्तूल जप्‍त करण्यात आले. त्यापैकी एका पिस्तूलने लंकेश, कलबुर्गी यांच्या हत्या झाल्याबाबत तपास करावयाचा आहे. 

डॉ. कलबुर्गी हत्येचा सीआयडी तपास करत आहे. कलबुर्गी आणि लंकेश हत्येतील संशयित एकाच संघटनेतील असल्याचे एसआयटीच्या तपासात दिसून आले आहे. त्यामुळे सीआयडीने एसआयटीकडून याबाबतची माहिती मिळविली आहे. या प्रकरणी अटकेतील संशयित बंगळुरातील परप्पन कारागृहात आहेत. सोमवारपासून सीआयडीने संशयितांची चौकशी सुरू केली आहे. पहिल्या दिवशी चार तास चौकशी झाली. परशुराम वाघमारे, अमोल काळे, अमित दिगवेकर, गणेश मिस्कीन, अमित बद्दी, मनोहर येडवे, के. टी. नवीनकुमार, मोहन नाईक आदींची चौकशी करण्यात आली.