Sun, Jul 21, 2019 01:27होमपेज › Belgaon › जगणे अवघड की आव्हाने कठीण

जगणे अवघड की आव्हाने कठीण

Published On: Feb 02 2018 1:33AM | Last Updated: Feb 01 2018 11:55PMबेळगाव : प्रतिनिधी

शहरात दोन दिवसात दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. शालेय वयात विद्यार्थ्यांनी कवटाळलेला मृत्यू चटका लावणारा आहे. यामुळे समाजमन ढवळून निघाले असून मुलांच्या बदलत्या मानसिकतेबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. जगणे अवघड बनले म्हणून की आव्हाने कठीण झाली म्हणून आत्महत्या झाल्या, याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. 

शहापूर येथील साहिल संतोष कोलवेकर (20) यानेे मंगळवारी तर अनगोळ येथील आशिष उत्तम रजपूत (16) यांने बुधवारी आत्महत्या केली आहे. साहिल हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता तर आशिष हा इयत्ता दहावीच्या वर्गात होता. दोघांनीही नैराश्याच्या भरात आत्महत्या केल्या. तारुण्याच्या ऐन उंबरठ्यावर  उभे असणार्‍या युवकांनी मृत्युला का कवटाळलेे हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

दोघांच्या आत्महत्यामुळे  समाजात खळबळ माजणे साहजिक आहे.  यापूर्वीही याप्रकारच्या दुदैवी घटना शहर परिसरात घडल्या आहेत. यातून ही मुले मरणाला का कवटाळतात, हा प्रश्‍न उभा ठाकला आहे.

यामागे असणार्‍या कारणांचा वेध घेण्यात येत आहे. बदलत्या समाजव्यवस्थेनुसार कौटुंबिक बंध पातळ होत चालले आहेत. चौकोनी कुटुंब पद्धतीमुळे माया, आपुलकीची नाती हरवत आहेत. त्यामुळे अडचणीच्या काळात आधार देणारे आप्तेष्ट कमी होत आहेत.

पालकानाही मुलासोबत संवाद साधण्याला पुरेसा वेळ मिळत नाही. पालकांना वाढत्या गरजा भागविण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतात. या धावपळीत मुलांच्याकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. त्याचबरोबर मर्यादित कुटुंबामुळे मुलांचे फाजील लाड करण्यात येतात. मुलांना लहानपणापासून कधीही नकार माहीत नसतो. यातून हट्टीपणा, अतिरेकपणा मुलांच्यात वाढतो. 

आयुष्यात संघर्ष करावा लागतो, याची जाणीव पालकांनी मुलांना वेळीच करून देण्याची आवश्यकता असते. याअभावी मुले चटकन नैराश्येच्या गर्तेत जातात. यातून टोकाचा निर्णय घेऊन  मृत्युला कवटाळणे पसंद केले जाते. 

आयुष्यातील 16 ते 20 हे वय ज्ञानार्जन करण्याचे असते. या काळात  केलेल्या ज्ञानार्जनातून संपूर्ण आयुष्य घडत असते. याची जाणीव पालकांनी करून देणे आवश्यक आहे. यासाठी पालकांचेही समुपदेशन करणे अत्यावश्यक आहे.