होमपेज › Belgaon › रक्षाबंधन ठरले अखेरचेच

रक्षाबंधन ठरले अखेरचेच

Published On: Aug 28 2018 1:23AM | Last Updated: Aug 28 2018 1:23AMखानापूर : प्रतिनिधी

गोव्यात राहणार्‍या बहिणींच्या हातून राखी बांधून घेऊन मित्रांसह बेळगावला परतणार्‍या भावाच्या कारने बसला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघे जण जागीच ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी आहेत. जखमींना प्रथम जिल्हा रुग्णालयात आणि नंतर केएलईमध्ये हलवण्यात आले आहे. बेळगाव-खानापूर रस्त्यावर इदलहोंड फाट्याजवळ सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.

दामोदर तानाजी तिंबले (वय 28, रा. सुभाषनगर वसाहत गांधीनगर-बेळगाव) आणि रमेश अशोक ताशिलदार (35, कसाई गल्ली बेळगाव) अशी मृतांंची नावे असून, त्यांचे मित्र दिनेश रामजी (22, रा. कसाई गल्ली, बेळगाव) आणि दीपक जाधव (24, मूळ-केदनूर महाराष्ट्र, सध्या राहणार ज्योतिनगर, कंग्राळी) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृत दामोदर तिंबले आणि जखमी दिनेश रामजी या दोघांच्या बहिणी गोव्यात वास्तव्यास असतात. ते दोघे आपल्या अन्य दोन मित्रांसोबत रक्षाबंधनानिमित्त शनिवारी गोव्याला गेले होते. रक्षाबंधनाचा सोहळा पार पाडून आज, सोमवारी सकाळी ते परतीच्या प्रवासाला निघाले. चोर्लामार्गे घाटात पाऊस असल्याने ते अनमोडमार्गे खानापूरला आले. तेथून बेळगावच्या दिशेने जात असताना इदलहोंड फाट्यानजीक कोल्हापूरहून हल्याळला जाणार्‍या बसची कारला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, कारचा समोरचा भाग बसखाली सापडून कारचा चक्काचूर झाला. आजूबाजूच्या लोकांनी महत्प्रयासाने सुमारे एका तासानंतर बसमध्ये अडकलेली कार बाहेर काढली. चौघेही जखमी रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत होते. लागलीच रुग्णवाहिकेला कळविण्यात आले. तोपर्यंत नाक, कान व तोंडातून प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने दोघांंचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोघा जखमींना तातडीने बेळगाव सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक वाटल्याने तेथून केएलईएस इस्पितळात हलविण्यात आले.

जखमींवर केएलई इस्पितळातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. कारचचालक दामोदर तिंबले हे दुबईतील शिंपिंग कंपनीत नोकरीला होते. रक्षाबंधन व गणेशोत्सवासाठी ते गावी आले होते.
रक्षाबंधनासाठी बहिणींच्या मायेखातर राखी बांधून घेण्यास गेलेले असता जीवलग मित्रांचा असा दुर्देवी मृत्यू ओढवल्याने खानापूर, बेळगाव व गोवा परिसरातूनही हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताच्या जागेचा महामार्ग दोन कि. मी.पर्यंत सरळ आहे. याठिकाणी कोणतेही वळण नाही. तरीही मोकळ्या रस्त्यावर इतका मोठा भीषण अपघात घडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अपघातानंतर जमाव बनला संतप्त

अपघातानंतर बसचालकाने रस्त्यातच बस सोडून पलायन केले. त्यामुळे बसमधील प्रवाशांची बरीच गैरसोय झाली. अपघाताचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. त्यामुळे बसचालकाच्या बेफिकिरपणाबद्दल उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन बसच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जमावाला पांगविल्याने गोंधळाचे वातावरण निवळले.

नातेवाईकांचा आक्रोश

गणेबैलजवळ झालेल्या अपघाताची घटना समजताच नातेवाईक, मित्र तातडीने जिल्हा इस्पितळाच्या आवारात दाखल झाले होते. मृत रमेश व दामोदरच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश  केला. जिल्हा इस्पितळ आवारात मोठी गर्दी झाली होती. राखी बांधून परतत असताना घडलेल्या या अपघातोबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत होती.