Thu, Jul 18, 2019 06:52होमपेज › Belgaon › बस पलटी; दोन प्रवासी जागीच ठार

बस पलटी; दोन प्रवासी जागीच ठार

Published On: Jul 15 2018 1:28AM | Last Updated: Jul 15 2018 12:27AMबेळगाव : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर महामार्गावर बडेकोळ्ळमठ क्रॉसवर केएसआरटीसीची बस रस्त्यावरच पलटी होऊन दोन प्रवासी जागीच ठार झाले, तर 6 जण जखमी झाल्याची दुर्घटना शनिवारी पहाटे घडली. उतरतीला असलेल्या अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकाला धडकून उलटली.

उडपी आगाराची बस बेळगावहून होन्नावरला जात असताना पहाटे साडेसहाच्या सुमारास अपघात झाला. बस महामार्गावरच उलटल्याने बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. 

घटनास्थळी हिरेबागेवाडी पोलिसांंनी धाव घेऊन अपघातग्रस्त बस बाजूला करून वाहतुकीला मार्ग मोकळा करून दिला. अशोक दुंडी (वय 39, रा. निच्चनक्‍की ता. कित्तूर) असे एका मृताचे नाव असून, दुसर्‍या मृताची ओळख पटलेली नाही. दुसर्‍या मृताचे वय 55 ते 60 असून पोलिसांकडून ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.अशोक हाही केएसआरटीसीमध्ये चालकच असून, सेवा संपवून तो या बसने कित्तूरला घरी जात होता. तो अपघातग्रस्त बसच्या चालकाच्या बाजुलाच बसला होता. 

अपघातात सहा जण जखमी असून, चौघांंची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसवाहक राजू इराप्पा कोटेण्णावर (वय 55, रा. धारवाड), महंमदशेख फकरुद्दीन शेख (वय 68, रा. गोकाक), खाातुनबी महंमदशेख शेख (वय 65, रा. गोकाक), अश्‍विनी श्रीकृष्ण हुक्केरी (वय 44, रा. धारवाड), अनिल महावीर मानगावे (वय 22, रा. ऐनापूर, ता. अथणी), जे. सी. शिवप्पागौड (वय 45, रा. संकेश्‍वर)अशी जखमींची नावे आहेत.   काही जणांवर जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. तर काहींना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. चालक शिवानंद कल्लाप्पा लंकण्णवर (वय 29, रा. कीरेसुर, ता. हुबळ्ळी) हाही किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताची नोंद हिरेबागेवाडी पोलिसांत झाली आहे.

न्यूट्रल केल्याने अपघात?

बस न्यूट्रलमध्ये घातल्याने चालकाचे नियंत्रण सुटले, चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडला, अशी नोंद पोलिसांनी केली आहे.  बडेकोळ्ळमठ क्रॉसवर गेल्या तीन महिन्यांतच पाच अपघात झाले आहेत. उतरती आणि अवघड असे एल आकारचे वळण यामुळे भरधाव वेगाने येणारे वाहन उलटतेच, असा चालकांचा अनुभव आहे.