Thu, Jul 18, 2019 16:34होमपेज › Belgaon › ‘त्या’ दोन बेपत्ता मुलींचा मुंबईत छडा

‘त्या’ दोन बेपत्ता मुलींचा मुंबईत छडा

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 1:04AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

कुटुंबियांना न कळविता नोकरीसाठी परगावी गेलेल्या बेळगावातील दोन बेपत्ता मुलींचा मुंबईत छडा लागला आहे. त्या दोघीही सुरक्षित आहेत. त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्‍त सीमा लाटकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

सदर प्रकरणासंदर्भात लाटकर पुढे म्हणाल्या, 21 आणि 24 वयाच्या या दोघी शहराजवळील एका गावच्या आहेत. त्या दोन्ही मुली 6 डिसेंबरपासून घरच्यांना न कळविता बाहेर पडल्या होत्या. नोकरीसाठी त्या दोघी घराबाहेर निघाल्या. त्यांच्याजवळ 2 हजार रु. होते. बेळगावातून त्यांनी प्रथम मिरज गाठले. तेथून पुढे त्या मुंबईला गेल्या होत्या. मुली बेपत्ता झाल्याने कुटुंबीय हवालदिल झाले होते. मुलींच्या बेपत्ता प्रकरणावरून काहींनी आंदोलनही केले होते. त्यामुळे पोलिस प्रशासनावर बेपत्ता मुलींचा शोध लावण्याची महत्त्वाची जबाबदारी होती. त्या मुलींनी आपणाकडील मोबाईल बंद केल्यामुळे त्यांचा शोध घेण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्या बेपत्ता मुलींच्या शोध कार्यांतर्गत एकीच्या घरातील मुलीची डायरी वाचण्यात आली. त्यातील माहितीनुसार त्या दोघी मुंबईला गेल्या असाव्यात, असा संशय व्यक्‍त करण्यात आला. डायरीत मिळालेल्या माहितीच्या आधारे बेळगाव पोलिसांनी मुंबई गाठले आणि त्यांना ताब्यात घेतले. त्या  दोघींंना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.