Wed, Aug 21, 2019 01:55होमपेज › Belgaon › अपघातात दोन ठार

अपघातात दोन ठार

Published On: Jan 26 2018 1:22AM | Last Updated: Jan 25 2018 10:38PMखानापूर : प्रतिनिधी

महिंद्रा पिकअपचे जॉईंट तुटून समोरून येणार्‍या दुचाकीवर कोसळल्याने त्या खाली सापडून दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाल्याची दुर्घटना खानापूर तालुक्यातील गस्टोळीजवळच्या गोमारी तलावानजीक गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली.

रुद्रगौडा पॅटिगौडर (वय 48),  शंकर मंडळ (28, दोघेही रा. भुरुणकी क्रॉस, ता. खानापूर) अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत.

शंकर व रुद्रगौडा हे दुचाकीवरून भुरुणकीहून बिडीच्या दिशेने येत होते. तर जनावर असलेला महिंद्रा पिकअप बिडीकडून भुरुणकीच्या दिशेने जात होता. गोमारी डॅमनजीक महिंद्राचे मध्यभागी असणारे जॉईंट तुटल्याने वाहनाने दोन पलटी घेतल्या. तिसरी पलटी समोरून येणार्‍या दुचाकीवर जाऊन कोसळल्याने दोघेही त्याखाली दाबले गेले. जबर मार बसल्याने दोघेही जागीच ठार झाले, तर महिंद्रामधील दोघेजण किरकोळ जखमी झाले.

याबाबत नंदगड पोलिसांना माहिती मिळताच पीएसआय यू. एस. आवटी यांनी घटनास्थळी धाव घेऊन अन्य जखमींना दवाखान्यात हलविले. मयत रुद्रगौडा हा बिडी परिसरात मोटार दुरुस्तीचे काम करत होता. बिडी येथील बाजारात साहित्य खरेदीसाठी जात असताना काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे.