Fri, Jul 19, 2019 15:48होमपेज › Belgaon › बस-ट्रक अपघातात 2 ठार, 22 जखमी 

बस-ट्रक अपघातात 2 ठार, 22 जखमी 

Published On: Jul 08 2018 1:43AM | Last Updated: Jul 07 2018 11:45PMकारवार : प्रतिनिधी  

राज्य परिवहन  महामंडळाची  बस व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात बसमधील दोन प्रवासी जागीच ठार झाले तर 22 प्रवासी जखमी झाले. सदर दुर्घटना कुमठा येथील पांडुरंग हॉटेलसमोर राष्ट्रीय महामार्ग 66 वर शनिवारी सायंकाळी 5 च्या सुमारास घडली.

शशिकला हरिकंत्र (वय 60) रा.गोकर्ण व वेंकटेश गुनगा (वय 46)  रा. तोर्के अशी मृतांची नावे आहेत. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर मणिपाल येथील इस्पितळात उपचार सुरू आहेत. राज्य परिवहन मंडळाची कुमठा आगाराची बस कुमठा येथून गोकर्णकडे निघाली होती. बसमध्ये 33 प्रवासी होते.  बसच्या मागून लोखंडी क्रेन  ट्रक घेऊन निघाला होता.  ट्रकमधील क्रेनचा पुढील भाग कुमठा येथे बसवर आदळल्याने बसचा मागील भाग तुटला. त्यामुळे सीट मोडून प्रवाशांवर आदळले. यामध्ये दोन प्रवासी जागीच ठार झाले. ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळेच अपघात घडल्याचा संशय आहे.

अपघातस्थळी धावून आलेल्या नागरिकांनी बसमधील सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून मणिपाल इस्पितळात हलविले.17 जणांवर उपचार करून घरी पाठवून देण्यात आले.   5 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची  संख्या वाढण्याची शक्यता आहे. कुमठा पोलिसांत अपघाताची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.