Mon, Nov 19, 2018 11:05होमपेज › Belgaon › खानापूर नगरपंचायतचे दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

खानापूर नगरपंचायतचे दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

Published On: Mar 20 2018 1:47AM | Last Updated: Mar 20 2018 12:41AMखानापूर : प्रतिनिधी

रितसर खरेदी केलेली गुंठाभर जमीन नावावर नोंद करून देण्यासाठी एका टेम्पो-चालकाकडून 15 हजार रुपयांची लाच घेताना नगरपंचायतीचा प्रभारी महसूल निरीक्षक रमेश हिरेहोळी  आणि त्याचा सहायक शशिकांत महाजन अशा दोघांना अटक करण्यात आली.

भरत अळवणी नामक टेम्पोचालकाचे केएसआरपी रोडवरील दुर्गानगर वसाहतीत घर आहे. घराच्या मागे सर्व्हे क्र. 71/अ मधील एक गुंठा जमीन त्यांनी जागामालक राजू जळगेकर यांच्याकडून खरेदी केली होती. सदर जागा नावावर करून घेण्यासाठी अळवणी यांनी नगर पंचायतीच्या महसूल निरीक्षकांकडे अर्ज केला होता. या कामासाठी हिरेहोळी याने 35 हजार रु.ची मागणी केली. इतके पैसे नाहीत असे सांगून अळवणी यांनी दहा हजार रु. देऊन जागा नावावर करून घेतली. मात्र, तेवढ्यावर समाधान न मानता हिरेहोळी याने उर्वरित 25 हजार रु. त्वरित आणून द्या, अन्यथा नोंद केलेली जागा पुन्हा रद्द करू, अशी धमकी दिली. 

गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने पैशासाठी तगादा लावल्याने अखेरीस अळवणी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली. त्यानुसार एसीबीचे एसपी अमरनाथ रेड्डी, डीएसपी रघू आणि पो. नि. वाय. एस. धरनायक यांनी सापळा रचून लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. हिरेहोळी याच्या सांगण्यावरून त्याचा सहायक महाजन याने अळवणी यांच्याकडून रक्‍कम स्वीकारली. त्यामुळे तोही याप्रकरणी एसीबीच्या कचाट्यात अडकला असून याप्रकरणी आणखी एका सहायकाचाही सहभाग असल्याने एसीबीने त्यादिशेने तपास चालविला आहे.

आजच्या कारवाईने नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे निघाले. कारवाईत बी. एस. गौडर, रवी मावरकर, एल. एस. होसमनी, लिंगय्या मठ्ठद, गस्ती आदींनी भाग घेतला.