बेळगाव : परशराम पालकर
बेळगाव शहर व उपनगरात वर्षाकाठी सुमारे अडीच हजार लोकांचा मृत्यू होतो. त्यांच्यावर हिंदू , मुस्लीम व ख्रिश्चन स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कार होतात. या स्मशानभूमींमधून मिळालेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात म्हणजे 2017 मध्ये 2 हजार 434 जणांचा मृत्यू झाला आहे.
बेळगावमधील चव्हाट गल्लीची स्मशानभूमी स्वतंत्र असून त्या मृत्यूंची नोंद थेट महानगरपालिकेत होते. तर अनगोळ, वडगाव व लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार्यांची नोंदही स्मशानात न होता थेट महानगरपालिकेत होते. सदाशिवनगरातील स्मशानभूमीत महिन्याकाठी 89 जणांचा नैसर्गिक मृत्यू होतो. तर शहापूर स्मशानभूमीत महिन्याकाठी 61 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मुस्लीम स्मशानभूमीत महिन्याकाठी 45 जणांचा मृत्यू होतो. ख्रिश्चन स्मशानभूमीत महिन्याकाठी 7 जणांचा मृत्यू होतो. अशी नोंद स्मशानभूमीत ठेवलेल्या रजिस्टरच्या नोंदीवरुन दिसून येते.
स्मशानभूमीत मृत्यू दिनांक, मयताचे नाव, मृत्यूचे ठिकाण, वय, लिंग, जात, व्यवसाय, मयताच्या आईचे नाव, मयताच्या घरचा पत्ता, मृत्यूचे कारण, माहिती देणार्याचे नाव, सही अशी माहिती रजिस्टरमध्ये नोंद करुन ठेवली जाते. या प्रमाणे महापालिकेत मृत्यूची नोंद होत असून तेथून मृत्यूचा दाखला मिळण्याची सोय आहे.
अत्यंसंस्कारामध्ये हिंदू पध्दतीने मुख्य दोन प्रकार पडले आहेत. लाकडावर व शेणीवर अंत्यसंस्कार करता येतात. शेणीवर अंत्यसंस्कार केल्यास सव्वा क्विंटल लाकूड व 400 शेणी लागतात. तेच जर लाकडावर अंत्यसंस्कार केले साडेतीन क्विंटल लाकडे लागतात.
जागेचा प्रश्न
मुस्लीम व ख्रिश्चन स्मशानभूमीत दफनासाठी भविष्यात जागेचा प्रश्न निर्माण होणार आहे. कारण दफन केलेल्या जागी थडगे बांधण्याची प्रथा दोन्ही समाजामध्ये आहे. स्मशानभूमीचा विकासाचा मुद्दा महापालिकेत गाजत असुन गेल्या आठवड्यात पाहणी झाली आहे. आता तिसरा डोळा स्मशानभूमीवर कार्यरत ठेवण्याच्या दृष्टीने हलचालीना वेग आला आहे.