Sun, May 26, 2019 09:28होमपेज › Belgaon › पक्षामधील लढती आधी भावाभावांमध्येच संघर्ष

पक्षामधील लढती आधी भावाभावांमध्येच संघर्ष

Published On: Feb 26 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 7:52PMबेळगाव ः महेश पाटील

बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा निर्माण केलेल्या जारकीहोळी बंधूंमध्येच आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारसंघ आणि उमेदवारी मिळविण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. यमकनमर्डीमध्ये आ. सतीश जारकीहोळी आणि त्यांचे बंधू उद्योजक लखन यांच्यामध्ये कुरघोडीला प्रारंभ झाला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

यमकनमर्डी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व सतीश जारकीहोळी करीत आहेत. त्यांनी विविध विकासकामे राबवून जम बसविलेला आहे. यमकनमर्डी मतदारसंघ बहुभाषिक असून सर्व भाषकांना एकत्र घेऊन जाण्याचे कसब आ. जारकीहोळी यांनी दाखविले आहे. मात्र भाऊबंदकीचा फटका बसण्याची शक्यता आहे. 

पालकमंत्री व मोठे बंधू रमेश यांनी यमकनमर्डीतून लखन यांना उमेदवारी देण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहे. येथून आपल्यालाच काँग्रेसमधून उमेदवारी मिळेल, असे लखन जारकीहोळी यांनी जाहीर केले आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत आपले नाव असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी मटले आहे. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे.  गोकाकमधून जारकीहोळी बंधूंनी राजकारणाला सुरूवात केली. सतीश, रमेश जारकीहोळी हे काँग्रेसचे विद्यमान आमदार असून भालचंद्र जारकीहोळी अरभावीचे भाजपचे आमदार आहेत. या तिघांनीही जिल्हापालकमंत्री आणि राज्याचे मंत्रिपद उपभोगले आहे. राजकीय प्रवासामध्ये लखन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राजकारण, आमदारपद यापासून दूर राहिलेल्या लखन यांनी आता रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यमकनमर्डीची त्यांनी निवड केली असून दोन वर्षात संपर्क वाढवला आहे. काँग्रेसने तिकीट दिले नाही तर प्रसंगी भाजपमधून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. 

चिकोडी जिल्हा मागणीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये कुरघोडी सुरू झालेली आहे. गोकाक जिल्हा मागणीसाठी आ. भालचंद्र आग्रही आहेत. मात्र काँग्रेसचे अन्य नेते व सतीश जारकीहोळी, खा. प्रकाश हुक्केरी चिकोडी जिल्हा होण्यासाठी सक्रिय झाले आहेत. लखन जारकीहोळी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. जिल्ह्याच्या राजकारणातील सध्याची परिस्थिती पाहता आ. सतीश जारकीहोळी, पालकमंत्री रमेश जारकीहोळी, आ. भालचंद्र जारकीहोळी, राज्य महिला काँग्रेसच्या अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर, खा. प्रकाश हुक्केरी, आम. अशोक पट्टण हे निवडणुकीत काँग्रेसला तारणार की काँग्रेसमधील बंडाळीचा लाभ भाजपला होणार, हे आता पाहावे लागणार आहे.