Sun, Aug 25, 2019 08:52होमपेज › Belgaon › चिकोडीत 12 वर्षीय मुलीचा डेंग्यूने मृत्यू

चिकोडीत 12 वर्षीय मुलीचा डेंग्यूने मृत्यू

Published On: May 31 2018 1:35AM | Last Updated: May 31 2018 12:34AMचिकोडी : प्रतिनिधी

शाळेच्या पहिल्याच दिवशी डेंग्यूने 12 वर्षीय मुलीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना चिकोडीतील मातंगकेरीत घडली आहे. भूमिका राजू कांबळे (वय 12) असे दुर्दैवी मुलीचे नाव आहे.

शहरातील मांतगकेरीतील भूमिका राजू कांबळे ही मुलगी मागील चार दिवसांपासून तापाने आजारी होती. घरच्यांनी निपाणी व संकेश्‍वर येथे बालरोगतज्ज्ञांना दाखविले. तरीदेखील मुलीच्या प्रकृतीत फरक न पडल्याने चिकोडीत रक्‍त तपासणी केल्यानंतर डेंग्यूची लागण झाल्याचे उघडकीस आले. लागलीच बेळगाव केएलई इस्पितळात दाखल करण्यात आले; पण उपचाराचा काहीही उपयोग न होता मंगळवारी दुपारी 4.30 वा.च्या दरम्यान डेंग्यूने मृत्यू पावली. मंगळवारी रात्री उशिरा तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मोलमजुरी करणार्‍या राजू कांबळे यांना एक मुलगी व एक मुलगा असून, मोठी मुलगी भूमिका सातवीत शिक्षण घेणार होती. आज शहरातील बसव सर्कलनजीकची सरकारी आदर्श प्राथमिक शाळेत शोकसभा घेउन शाळा सुट्टी देण्यात आली.

तालुका आरोग्याधिकार्‍यांची भेट

घटनेची माहिती कळताच तालुका आरोग्याधिकारी डॉ.विठ्ठल शिंदे यांच्यासह आरोग्य खात्याच्या अधिकार्‍यांनी भेट दिली. भूमिका या मुलीवर प्रारंभी रक्ततपासणी न केल्यामुळे डेंग्यूची लागण झाल्याचे कळण्यास उशिरा झाला. यामुळे डेंग्यूसह काविळ होऊन मुलीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सर्व आरोग्य खात्याच्या कर्मचार्‍यांना बोलवून त्या भागात पाणी बदलणे, जंतूनाशकांची फवारणीसह इतर उपायोजना राबविणार असल्याचे डॉ. शिंदेंनी दै.‘पुढारी’ला सांगितले.