Wed, Jul 17, 2019 20:45होमपेज › Belgaon › स्वातंत्र्याच्या सत्तरीतही नाही एसटीची गाठ

स्वातंत्र्याच्या सत्तरीतही नाही एसटीची गाठ

Published On: Jun 22 2018 2:09AM | Last Updated: Jun 21 2018 7:55PMबेळगाव : अंजर अथणीकर 

स्वातंत्र्याची सत्तरी उलटूनही बेळगाव जिल्ह्यातील बारा गावांनी अद्याप एसटीच पहिली नाही. बस प्रशासनाने वेळोवेळी मागणी करुनही या गावात अद्याप रस्ता झालेला नाही.  हे सर्व रस्ते अद्याप पाऊलवाटेनेच जोडले आहेत. विद्यार्थ्यांना पाच ते सहा कि. मी. चालत जाऊन शाळेत जावे लागत असल्याचे विदारक चित्र पाहण्यास मिळत आहे. 

जिल्ह्यामध्ये तीनशेहून अधिक लोकवस्ती असलेली एक हजार 147 गावे आहेत. यामध्ये बेळगाव एसटी विभागात 641 गावे असून चिकोडी विभागात 506 आहेत.  बेळगाव विभागातील 641 पैकी 630 गावांमध्ये बससेवा पुरवण्यात आली आहे. चिकोडी विभागात 505 गावांमध्ये बससेवा देण्यात आली आहे.

दोन्ही विभागात मिळून बारा गावांमध्ये बससेवा नाही. ही गावे अक्षरश: पाऊलवाटेने जोडली आहेत. खासगी वाहनेही तेथे जात नाहीत. निवडणुकीच्या काळात अधिकार्‍यांना कसरत करावी लागते. पावसाळ्यात तर परिस्थिती खूपच वाईट असते. या दरम्यान तीन ते चार महिने या गावांचा संपर्क तुटलेलाच असतो.

सर्वात वाईट स्थिती असते ती शालेय मुलांची. प्राथमिक शाळेला जाण्यासाठी मुलांना चार ते पाच कि. मी. पायपीट करावी लागते. खानापूर तालुक्यातील अनेक गावे दुर्गम असल्याने आणि जंगलातून पाऊलवाट जात असल्यामुळे जंगली श्‍वापदापासून जीव वाचवत मुलांना जावे लागते.

गाव तेथे एसटी सेवा देण्यासाठी एसटी प्रशासन तत्पर आहे. यासाठी अधिकार्‍यांनी या गावांचा दौरा केला. आम्हाला रस्ता करुन द्या, आम्ही तात्काळ बससेवा देतो, असा अहवालही एसटी विभागाने जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. मात्र याबाबत पुढे कोणतीही कार्यवाही झालेली नाही. निदान विद्यार्थ्यांसाठी तरी मिनी बससेवा पुरवण्यात यावी, अशी मागणी होत आहे. गतवर्षी बेळगाव विभागातील वीस तर चिकोडी विभागातील सहा गावांमध्ये बससेवा नव्हती. यामधील आता बेळगाव विभागातील 9 तर चिकोडी विभागातील चार गावांना यावर्षी बससेवा सुरू झाली आहे.