Thu, Jul 18, 2019 17:07होमपेज › Belgaon › बारा बलुतेदारी ते ऐतिहासिक किल्‍ले

बारा बलुतेदारी ते ऐतिहासिक किल्‍ले

Published On: Dec 08 2017 1:36AM | Last Updated: Dec 07 2017 8:50PM

बुकमार्क करा


बेळगाव : प्रतिनिधी

नेहमी पुस्तके, पेन, दप्तर, अभ्यास यामध्ये गुंतून असणार्‍या विद्यार्थ्यांनी दगड-मातीशी झटापट करत छ. शिवाजी महाराजांचा इतिहास समजावून घेत त्यांची वास्तूकला जाणून घेत किल्ल्याच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. यामध्ये बारा बलुतेदारी दाखविणारी समाजव्यवस्था व परकीय आक्रमणापासून बचाव करण्यासाठी साथ देणार्‍या किल्ल्यांचा समावेश आहे.

छ. शिवरायांच्या स्वराज्यामध्ये त्यांनी उभारलेल्या किल्ल्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे प्रबळ शत्रू समोर असतानादेखील स्वराज्य निर्माण केले. याचा  अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा, यासाठी जनकल्याण ट्रस्ट संचलित संत मीरा मराठी माध्यम शाळा, लक्ष्मीनगर यांनी किल्ल्यांच्या भव्य प्रतिकृती साकारल्या आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, देशभक्ती आणि इतिहासाची माहिती समजावी यासाठी वेगवेगळे उपक्रम नेहमीच राबविण्यात येतात. त्यातूनच मागील वर्षापासून शाळेच्या प्रांगणात किल्ला प्रतिकृती करण्यात येत आहेत. याला विद्यार्थी, पालक, शिक्षकांचे सहकार्य लाभत आहे. याठिकाणी मागील वर्षी आठ किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. यामुळे यावर्षीदेखील हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

किल्ला साकारताना प्रत्येक किल्याच्या अभ्यास करून त्याची उभारणी केली आहे. उभारण्यात आलेले  किल्ले पाहणार्‍यांना इतिहासाची जाणीव नकळतपणे होते. यातून शिवरायांच्या वेगवेगळ्या पैलूंचा नकळत अभ्यास होतो.

यावेळी किल्ले राजगड, तोरणा, मुरूड-जंजिरा, वसईचा किल्ला व तत्कालीन समाजव्यवस्था समजून देणारी बारा बलुतेदारी व्यवस्था प्रतिकृतीच्या माध्यमातून साकारण्यात  आल्या आहेत. प्रतिकृती साकारण्यासाठी विद्यार्थ्यांना कल्लेहोळ येथील काही इतिहासप्रेमी युवकांनी मदत केली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना किल्ले साकारण्यासाठी माहिती देण्याबरोबरच मार्गदर्शन केले. यामुळे किल्ल्यांच्या सुंदर अशा प्रतिकृती विद्यार्थ्यांनी निर्माण केल्या आहेत. त्या शनिवारपर्यंत नागरिकांसाठी खुल्या ठेवण्यात आल्या आहेत.

बुधवारी या प्रतिकृतींचे  उद्घाटन ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेत बाजी प्रभू देशपांडेंची भूमिका साकारणार्‍या प्रसाद पंडित यांच्याहस्ते झाले. यावेळी शिवशाहीची अनुभूती देणार्‍या कार्यक्रमाचे व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांना इतिहास समजून घेणे सोपे गेले.